१,६०० कर्मचारी संपावर : २७७ बसगाड्या जागीच उभ्या वर्धा : वेतन वाढीची मागणी करीत परिवहन महामंडळा कर्मचाऱ्यांनी गुरुवारी राज्यव्यापी संप पुकाराला. यात वर्धेत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. येथून एकही बस धावली नाही. यामुळे परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाला सुमारे २० लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती आहे. या संपामुळे मात्र प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागला. प्रवाश्यांना संपाची माहिती मिळताच त्यांनी मिळेल त्या वाहनाने जात आपले स्थळ गाठण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. या संदर्भात झालेल्या चर्चेतून मार्ग निघाला नसल्याने हा संप शुक्रवारीही तसाच राहणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे. वर्धेत पहाटे ५ वाजतापासून या संपाला प्रारंभ झाला. महामंडळाच्या वर्धा विभागात असलेल्या १,७०० कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १,६०० कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्याची माहिती संघटनेने दिली आहे. या संपामुळे जिल्ह्यातील पाच डेपोतील बस जागच्या जागीच उभ्या राहिल्या. रात्री हाल्टींग म्हणून गेलेल्या बसगाड्या पहाटेच्या सुमारास आगारात गोळा झाल्या. येथून सायंकाळपर्यंत एकही बस निघाली नाही. दिवसभर कर्मचाऱ्यांनी आगारात शासनाविरोधात निदर्शने केली. जिल्ह्यात परिवहन विभागाचे एकूण पाच आगारातून काम सुरू आहे. या पाचही आगरात कार्यरत कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन अत्यल्प असल्याच्या विरोधात हा संप आहे. या संपात जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. वर्धेतील पाचही आगारातील २७७ बसगाड्यांची चाके थांबली होती. या पाचही आगारातून एका दिवसाला सुमारे १ लाख २ हजार किलोमिटरचे अंतर गाड्या कापत असल्याची माहिती परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आले. यामुळे एका दिवसात परिवहन विभागाला २० लाख रुपयांचा फटका बसल्याचे सांगण्यात आले आहे.
बस बंदमुळे वर्धेत २० लाखांचा फटका
By admin | Updated: December 18, 2015 02:34 IST