निर्मल भारत अभियान : विकास वाटा मोकळ्यावर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून देशात निर्मल भारत अभियान राबविण्यात आले़ यात ग्रामीण भागाचा सहभाग असावा व गावे स्वावलंबी व्हावी म्हणून निर्मलग्राम ही संकल्पना मांडण्यात आली़ गत पाच वर्षांपासून या अभियानात गावे सहभागी होऊन निर्मल होत आहेत़ २०१४ मध्ये वर्धा जिल्ह्यातील १५ गावे निर्मल झाल्याचे शासनाने जाहीर केले आहे़ सर्वेक्षण केल्यानंतर हा अहवाल देण्यात आला़ यामुळे पात्र गावांच्या विकासाच्या वाटा मोकळ्या झाल्या आहेत़देशात निर्मल भारत अभियान राबविण्यात आले़ या अभियानात राज्यातील जवळपास सर्वच गावांनी सहभाग घेतला़ वर्धा जिल्ह्यातीलही बहुतांश गावे या अभियानात सहभागी झालीत़ या अभियानात २०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील १५ गावे पात्र ठरली आहेत़ यात आर्वी तालुक्यातील एक, आष्टी तालुक्यातील दोन, देवळीतील तीन, कारंजा (घा़) तालुक्यातील एक, समुद्रपूर येथील चार, सेलूतील एक, वर्धा तालुक्यातील दोन अशी १५ गावे पुरस्कारास पात्र ठरली आहेत़ देशातील निर्मल भारत अभियानात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे़ हागणदारी मुक्ती, स्वतंत्र पाणी पुरवठा योजना यासह गाव स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने निर्मल ग्राम अभियान राबविण्यात आले़ यात जिल्ह्यातील अनेक गावांनी सक्रीय सहभाग घेत गावे स्वच्छ व स्वावलंबी केली; पण यात सातत्य राखण्यात ही गावे अपयशी ठरल्याचे चित्र आहे़ निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त गावेही अस्वच्छ दिसू लागल्याने केवळ पुरस्कारासाठी योजना तर राबविल्या नाही ना, असा संशयही उपस्थित होत होता़ आता २०१४ चे निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाल्याने ही गावे तरी गावाचे निर्माल्य कायम राखतील काय, हा प्रश्नच आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
१५ गावे निर्मल
By admin | Updated: January 20, 2015 22:39 IST