हिंगणघाट: ठिबक सिंचनाद्वारे ओलीत करून पाण्याची बचत व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून शासनाकडून ५० टक्के अनुदान ठिबक सिंचन साहित्य देण्यात येत आहे. या योजनेकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून स्थानिक बाजार समितीने प्रति हेक्टर १५ हजाराचे अनुदान सुरू केल्याची माहिती सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी पत्रपरिषदेत दिली. उपलब्ध जलसंपत्तीचा विचार करून शेतातील पाण्याचे व्यवस्थापन ठिबक सिंचनाद्वारे केल्यास ५० ते ७० टक्के पाण्याची बचत होते. शिवाय पिकेही बहरतात. या सर्व बाबीचा विचार करून शासनाने दोन हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान ठिबक सिंचन योजना जाहीर केली. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात योजनेला अल्प प्रतिसाद मिळत १९९ हेक्टर शेतजमिनीवर सिंचन झाल्याची माहिती आहे. यामुळे योजनेला तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळावा म्हणून स्थानिक बाजार समितीच्यावतीने दोन हेक्टर पर्यंतच्या निव्वळ शेतीच उत्पन्नाचे साधन असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार रुपये तर शेतीसह अन्य व्यवसाय असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान देण्याची योजना १ एप्रिल २०१५ पासून सुरू केली आहे. सदर अनुदान शासनाच्या ५० टक्के अनुदाना व्यतिरिक्त देण्यात येणार असल्याची माहिती अॅड. कोठारी यांनी दिली. याचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी सात दिवसांत आवश्यक कागदपत्रे बाजारसमिती कार्यालयात देण्याचे आवाहन केले. यावेळी उपसभापती हरिश वडतकर, सुरेश सातोकर, मधुसूदन हरणे, वासुदेव गौळकार, अशोक उपासे, संजय कात्रे, बलराम नासरे, संजय तपासे, विनोद वानखेडे, मधुकर डंभारे, चंद्रमणी भगत, ओमप्रकाश डालीया, राजेश कोचर, राजेश मंगेकर, सुरेखा सायंकार, माधुरी चंदनखेडे तसेच सचिव तुळसीराम चांभारे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
सिंचनाकरिता शेतकऱ्यांना हिंगणघाट बाजारसमितीकडून १५ हजारांचे अनुदान
By admin | Updated: June 15, 2015 02:13 IST