वर्धा : सुमारे दहा वर्षांपूर्वी शहरातील मुख्य सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले़ यात एक किलोमीटरच्या बजाज चौक ते शिवाजी चौकादरम्यानच्या रस्त्यावर ११ ठिकाणी रस्ता दुभाजक तोडण्यात आले आहेत़ हल्ली वाहतुकीची प्रचंड वाढ झाल्याने या मुख्य मार्गावरील अपघातांतही अतोनात वाढ झाली आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक पोलीसही अपघातप्रवण स्थळ बनलेल्या चौकांकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येते़वर्धा शहरातील मुख्य रस्ता सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी सिमेंटचा करण्यात आला़ तत्कालीन आ़ प्रमोद शेंडे यांनी आपल्या देखभालीत या रस्त्याचे काम करून घेतले़ रस्त्यांचे बांधकाम सुरू असतानाच दुभाजकाचे काम करण्यात आले़ एक किमीच्या मुख्य रस्त्यावरील हे दुभाजक ११ ठिकाणी तोडण्यात आलेत़ यामुळे या मार्गावर ११ चौकाची निर्मिती झाली़ या प्रत्येक चौकात दिवसभर मोठी रहदारी असते़ शिवाय बाजारपेठ असल्याने ग्राहकांचीही गर्दी असते़ मुख्य रस्ता असल्याने वाहने भरधाव असतात़ जड वाहतूक शहराबाहेरून वळविली असली तरी दुचाकी चालकही सुसाट वेगाने धावतात़ यामुळे अपघातांत वाढ झाली आहे़ शहरातील शिवाजी चौक आणि ठाकरे मार्केट परिसरात दोन दुभाजकांमध्ये मोठे अंतर ठेवण्यात आले आहे़ यामुळे दररोज अपघातांना सामोरे जावे लागते़ याबाबत नागरिकांनी अनेकदा बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या, गतिरोधकाची मागणी केली; पण त्याकडे अद्याप लक्ष देण्यात आले नाही़ मुख्य रस्त्यावर गतिरोधक देता येत नाही, हे मान्य असले तरी दुभाजकांचे तुकडे तरी जोडणे शक्य आहे; पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे़ पोलिसांनीही या चौकातील अपघातांकडे दुर्लक्षच केले आहे़ याकडे लक्ष देत दुभाजक जोडणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
एक किमी रस्ता दुभाजकाचे ११ तुकडे
By admin | Updated: February 2, 2015 23:11 IST