वर्धा : क्षुल्लक कारणावरून डोक्यावर फरशी मारून हत्या केल्याप्रकरणी देवळी येथील किशोर प्रभाकर पादे (२१) याला दहा वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हा निकाल येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर अडकर यांनी शुक्रवारी दिला. याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, ४ जुलै २०१३ रोजी सायंकाळी ५़३० वाजता लिला रमेश साबळे यांनी त्यांचा मुलगा उमेश याला लाईन बंद असल्यामुळे दुरूस्ती करण्याकरिता वीज विभागाच्या कर्मचाऱ्याला बोलून आणण्यास पाठविले़ उमेश घरून निघाला असता अंदाजे सायंकाळी ६़३० वाजता अंगात घालण्याच्या शर्टाच्या कारणावरून किशोर पादे याने उमेश साबळे याच्यासोबत वाद केला व त्याला जीवाने मारण्याच्या उद्देशाने उमेशच्या डोक्यावर दगडी फरशीने जबर मारहाण केली़ यात उमेश याच्या डोक्याला जखम झाली़ यात त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असता १७ जुलै २०१३ रोजी त्याचा मृत्यू झाला. यावरून त्याच्या आईने देवळी पोलीस ठाण्यात तक्रार केली. ठाण्याचे पी़एस़आय पी़डब्ल्यू़ ठाकरे यांनी घटनेचा संपूर्ण तपास पूर्ण करून न्यायालयात प्रकरण सादर केले़प्रकरण साक्षपुराव्याकरिता न्यायाधीश समीर अडकर यांच्या न्यायालयात आले. यावेळी सरकारी अभियोक्ता अनुराधा सबाने यांनी एकूण नऊ साक्षदार तपासले व युक्तीवाद केला़ पुराव्यादरम्यान जमादार विनोद वानखेडे ब़ऩ ३४७ यांनी साक्षदारांना हजर केले. साक्षपुरावे व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश अडकर यांनी किशोर प्रभाकर पादे (२१) रा़ वॉर्ड क्रमांक १० देवळी याला कलम ३०२ भादंवी अन्वये १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व २५००० हजार रुपये दंड सुनावला. तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त सश्रम करावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
हत्येप्रकरणी १० वर्षे सश्रम कारावास
By admin | Updated: November 8, 2014 01:36 IST