मी घराबाहेर खेळायला जाऊ का विचारलं तर आई नाही म्हणते, आमच्या जवळची हॉटेल्स आता सुरु झाली आहेत पण तिथून काहीही मागवायला बाबा नाही म्हणतो, असं का? - जान्हवी देशपांडे, पुणो
- जान्हवी, आपण आता लॉक डाऊनमधून बाहेर येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. याला आपली सरकारने अनलॉक 1 असं नाव दिलेलं आहे. पण त्याचबरोबर लोकं जसजशी बाहेर पडायला लागतील, एकमेकांच्या संपर्कात येतील कोरोनाचा संसर्ग जास्त होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आपण काही सतत घरात बसू शकत नाही. कधी ना कधी तरी आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे, तशी देश म्हणून आपण केली आहे. पण याचा अर्थ असा नाही की कोरोनाचा धोका टळला आहे. म्हणूनच आता गरज नसताना बाहेर जाणं टाळणं आवश्यक आहे. तुम्हा मुलांना खूप कंटाळा आलेला आहे, पण त्याला काही पर्याय नाहीये. अजूनही मुलांनी घराबाहेर जाणं तितकंसं सुरक्षित नाहीये. म्हणूनच तर शाळाही सुरु करण्याविषयी अजून निर्णय झालेला नाही.