पावसाळ्यात पावसाच्या सरींमध्ये चिंब भिजणं सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे अनेकजण या पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. पण अनेकांना या दिवसात नेमकं जायचं कुठं किंवा कुठे गेल्यावर पावसाचा अधिक आनंद घेता येईल हे माहीत नसतं. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही खास पर्याय घेऊन आलो आहोत.
या ठिकाणांवर तुम्हाला केवळ सुंदर वातावरणच मिळणार नाही तर पाण्याची खळखळ, हिरवळही अनुभवता येईल. मनाला मोहिनी घालणारं असं वातावरण इथे तुम्ही अनुभवू शकता. या ठिकाणांवर थंडीत भिजण्याची मजाच वेगळी आहे. चला जाणून घेऊन या पावसाळ्या तुम्ही कुठे फिरायला जाऊ शकता.
अंदमान आणि निकोबार
कितीतरी द्वीपांचा समूह असलेलं हे ठिकाण कोणत्याही वातावरणात फिरण्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे. तशी तर इथे बघण्यासाठी-फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत, पण राजधानी पोर्ट ब्लेअर अधिक आकर्षक आहे. येथील समुद्राचं पाणी निळं चमकदार आहे आणि वाळू मोत्यांसारखी दिसते. येथील वातावरणही शांत आहे. त्यामुळे पावसाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता.
गंगटोक, सिक्कीम
सिक्कीमची राजधानी आणि सुंदर शहर गंगटोक आपल्या आकर्षणामुळे पर्यटकांच्या सर्वात पसंतीचं ठिकाण आहे. येथील प्राचीन मंदिरे, महाल आणि अद्भुत नजारे या ठिकाणाला एक वेगळीच ओळख देतात. तुम्ही या पावसाळ्यात गंगटोकमधील सुंदर वातावरणाचा अनुभव घेऊ शकता.
शिलॉंग, मेघालया
मेघालयाची राजधानी शिलॉंग एक फार सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे. डोंगरात वसलेलं हे छोटं शहर नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत राहिलं आहे. या ठिकाणाला पूर्वेतील स्कॉटलंडही म्हटलं जातं. येथील पावसाचा आनंद घेण्याची एक वेळीच मजा आहे. तसं तर इथे वर्षभर वातावरण मनमोहक असतं, पण पावसाळ्यात येथील सुंदरतेत चार चॉंद लावले जातात.
दार्जिलिंग, पश्चिम बंगाल
दार्जिलिंग पश्चिम बंगालचं स्वर्ग मानलं जातं. इथे दरवर्षी हजारोंच्या संख्यने पर्यटक भेट देत असतात. हे शहर चहाच्या बागांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात तर दार्जिलिंगची सैर करणं आयुष्यभर लक्षात असंच ठरेल. कारण चारही बाजूने असलेल्या चहाच्या बागा आणि दार्जिलिंगचे सुंदर डोंगर तुम्हाला प्रेमात पाडतील.
मुन्नार, केरळ
मुन्नार हे ठिकाण चहाच्या बागांसाठी आणि घुमावदार गल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथे भारतीय मसाल्यांचा सुंगध सगळीकडे येतो. कारण इथे मसाल्यांची शेतीही केली जाते. पर्यटकांमध्ये येथील हाऊसबोटिंग चांगलीच प्रसिद्ध आहे. मुन्नारमध्ये चहाच्या बागा, वॉन्डरला अम्यूझमेंट पार्क, कोची फोर्ट, गणपती मंदिर आणि हाऊसबोट आहेत.
कुर्ग, कर्नाटक
पश्चिम घाटांमध्ये पसरलेलं कुर्ग हे ठिकाणही पावसाळ्यात स्वर्गच भासतं. पावसाळ्यात येथील वातावरण पाहून लोक या ठिकाणाच्या प्रेमात पडतात. कुर्गमध्ये तुम्ही मंडालपत्ती, तिबेटीयन मठ, कावेरी नदी, इरूपू फॉल, इगुथापा मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, मरकारा डाऊन गोल्फ क्लब ही ठिकाणे बघू शकता.
गोवा
गोव्यात तशी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. पण पावसाळ्यात येथील वातावरण अधिकच मनमोहक होतं. खवळणारे समुद्र किनारे, जंगलातील उंचच झाडे यात धो-धो कोसळणारा पाऊस तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा ठरतो.
कोडेकानल, तामिळनाडू
तामिळनाडूचं रोमॅंटिक हिल स्टेशन कोडेकनाल फारच सुंदर आहे. पावसाळ्यात तर इथे प्रेमात पाडणारं असंच वातावरण असतं. दूरदूरपर्यंत पसरलेली हिरवळ आणि सुंदर फूलं मनाला मोहिनी घालतात.