(Image Credit : Varanasi Videos)
वाराणसी शहराचं नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं भगवान शंकराचं म्हणजेच, काशी विश्वनाथाचं मंदिर. याव्यतिरिक्त आपण सारेच जाणतो की, भगवान शंकराचं शहर म्हणून ओळख असणारं काशी मंदिरांसाठी ओळखलं जातं. येथे दररोज देश-विदेशातील पर्यटक येत असतात. तुम्हाला माहीत आहे का? येथे काशी विश्वेश्वराच्या मंदिराव्यतिरिक्त पशुपति नाथांचं मंदिरही आहे, जे अत्यंत प्रसिद्ध आहे. या मंदिराला 'नेपाळी मंदिर' असंही म्हटलं जातं.
बनारसमध्ये ललिता घाटावर असलेलं हे पशुपतिनाथाचं मंदिर नेपाळी लोकांच्या आस्थेचं प्रमुख केंद्र आहे. एवढंच नाहीतर या मंदिराच्या देखभालीचं कामही नेपाळ सरकारच करतं. काशी आणि नेपाळमधील पशुपतिनाथांच्या मंदिरात एकाच परंपरेनुसार, पूजा अर्चना केली जाते. एवढचं नव्हे तर या मंदिरामध्ये देवाची पूजा नेपाळी समुदायातील लोकांकडून करण्यात येते.
येथील मान्यतेनुसार, या मंदिरातील देवाचं दर्शन म्हणजेच नेपाळमधील पशुपतिनाथाच्या दर्शनासमानच मानलं जातं. तसेच काशी शहर जसं गंगा नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे, तसंच काठमांडू शहर बागमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पशुपति नाथाच्या रूपामध्ये शिवलिंग स्थापन केलेलं आहे.
नेपाळच्या राजाने तयार केलं होतं मंदिर...
पशुपतिनाथ मंदिर नेपाळचे राजा राणा बहादूर साहा यांनी उभारलं होतं. ते काशीमध्ये आलेले असताना तिथे पूजा करण्यासाठी त्यांनी नेपाळी वास्तूकला आणि शिल्पकलेनुसार शिव मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. राजांनी गंगेच्या काठावर मंदिर उभारण्याच्या कामाला सुरुवात केली. परंतु, 1806मध्ये मंदिराचं काम सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
राजाच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा राजा राजेंद्र वीर विक्रम साहा यांनी या मंदिराचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण केलं. 1843मध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं होतं. एवढचं नाहीतर या मंदिराचं काम नेपाळहून आलेल्या कामगारांनी केलं होतं. मंदिर तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली लाकडंही नेपाळहून मागवण्यात आली होती.