- पवन देशपांडेसहायक संपादकआपली कार एका उंच ठिकाणी पोहोचली आणि तेथून ती थेट अनेक फूट खोल कोसळतेय... हा अनुभव कसा असू शकेल? आता जीव जातो आपला... पहिला विचार येईल... आता जीव जातो आपला... असा काहिसा अनुभव यास आयलँडमध्ये तुम्हाला घेता येतो. तेही अत्यंत सुरक्षितपणे.
अबु धाबीमधले यास आयलँड अशाच अनेक थरारक आणि रोमांचक अनुभव घेणाऱ्यांसाठी उभं राहिले आहे. फेरारी वर्ल्डच्या वर्ल्ड फास्टेस्ट रोलर कोस्टरपासून ते सी वर्ल्डमधील खोल समुद्रातल्या भीतीदायक शार्कपर्यंत आणि वॉर्नर ब्रदर्स वर्ल्डच्या आश्चर्यचकीत करणाऱ्या प्रत्यक्ष हॉलीवूड दुनियेत रमण्यासाठी यास आयलँड आता पर्यटकांसाठी आकर्षणाचे पर्यटन स्थळ बनले आहे. जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटात ह्रतिक रोशन, फरहान अख्तर और अभय देओल हे एकमेकांना जसे टास्क देत साहसी पर्यटनाची मजा करतात, तशाच प्रकारचा अनुभव घेण्याची संधी मिराल डेस्टिनेशन्सने दिली.
फेरारी वर्ल्डच्या ‘फॉर्म्युला रोसा’ या वर्ल्ड फास्टेस्ट रोलर कोस्टरवर आम्ही जेव्हा स्वार झालो तेव्हाचा अनुभवही 'खतरनाक' असाच होता. त्यासाठी रांगेत आम्ही उभे होतो, तेव्हा एक वेगळीच उत्सुकता आणि भीती जाणवत होती. समोरच फेरारी एफ१ कारसारखी एक लाल ट्रेन उभी होती. त्यांनी खास संरक्षणात्मक गॉगल्स दिले. माझी सीट एकदम कडेची होती. सेफ्टी हार्नेस घट्ट बांधले गेले. ट्रेन लाँचिंग पॉइंटवर होती. कितीही भीती वाटली तरी, मागे फिरायचा प्रश्नच नव्हता. अचानक त्या ट्रेनने ४.९ सेकंदात शून्यावरून थेट २४० किलोमीटर प्रतितास वेग गाठला! जोरदार धक्का बसला. चेहऱ्यावर हवा आदळत होती, पण गॉगल्समुळे डोळे सुरक्षित होते.
‘ते’ एक मिनीट आणि बत्तीस सेकंद...ट्रेन १७० फुटांहून अधिक उंचीवर गेली आणि त्या उंचीवरून जेव्हा ती अचानक खाली आली तेव्हा अंगावर शहारा आला. संपूर्ण २.२ किलोमीटर लांबीचा ट्रॅक होता. वेगाने येणारी ती तीव्र वळणं, अचानक येणारे उतार आणि प्रचंड वेग पहिल्यांदा अनुभवयास येत होता. राइड फक्त एक मिनिट बत्तीस सेकंदांची होता, पण या क्षणांमध्ये वेळ थांबल्यासारखा वाटला. जेव्हा ट्रेन थांबली, तेव्हा माझा श्वास जणू थांबलेला होता. फेरारी वर्ल्डमध्ये अनेक अशा गोष्टींचा अनुभव घेता येतो.
येथे आपण शिरतो समुद्राच्या खोल गर्भात
यास आयलँडवरील सी वर्ल्डही असेच ठिकाण. तिथे पहिल्यांदा पाऊल टाकले, तेव्हा वाटले, जणू मी समुद्राच्या खोल गर्भात शिरलोय. समोरच प्रचंड डिजिटल महासागर – पूर्ण ३६० डिग्री! निळसर प्रकाश, चारही बाजूंनी फिरणारे हजारो समुद्री जीव आणि पाण्याचा सौम्य आवाज... हे काही साधं अॅक्वेरियम नाही तर महासागराच्या प्रत्येक रूपाला जवळून अनुभवण्याची संधी देणारे एक भव्य, जिवंत जग आहे.पोलर ओशियन, ट्रॉपिकल ओशियन, आर्क्टिक, एंडलेस ओशियन, रॉकी पॉइंट, अबु धाबी ओशियन या प्रत्येक झोनमध्ये एक नवीन वातावरण, नवीन प्राणी आहे. सर्वाधिक नजर खिळवून ठेवतो एंडलेस ओशियन विभाग. प्रचंड अॅक्रेलिक ग्लासमधून हजारो मासे, शार्क, मंता रे व इतर समुद्री जीव अगदी समोरून पोहताना दिसतात.डॉल्फिन्स आणि पेंग्विन्सना जवळून बघणे, त्यांच्या हालचाली टिपणे हे अनुभव अगदी मनाला भिडणारे होते. हजारो लहान-मोठे पर्यटक प्रत्येक विभाग आचंबित होऊन पाहताना दिसत होता.
हॉलीवूडच्या दुनियेत फिरून आल्याचा अनोखा अनुभवत्यानंतर वॉर्नर ब्रदर्स वर्ल्ड पाऊल टाकले. समोर होते बग्ज बनी, डॅफी डक, टॉम अँड जेरी, स्कूबी डू, सुपरमॅन, बॅटमॅन... सगळे स्वागताला तयार होते. वाटलं, मी कार्टून नेटवर्क किंवा कॉमिक्सच्या पानांत शिरलोय! हे पार्क पूर्णपणे इनडोअर आहे – वातानुकूलित, हवामानाशी असलेलं कुठलंही बंधन नाही. त्यामुळे उन्हातान्हाची चिंता न करता दिवसाचा प्रत्येक क्षण इथं मनसोक्त घालवता येतो.इथल्या प्रत्येक विभागात थरारक राइड्स आहेत. जस्टिस लीग नावाची राईड तुम्हाला थेट अवकाश सफर घडवते. इथे २९ पेक्षा जास्त राइड्स आणि आकर्षण केंद्र आहेत. प्रत्येक वयोगटासाठी शो आहेत. कार्टून, सुपरहीरो आणि हॉलिवूडचं त्रिकूट एकाच छताखाली पाहायला मिळते.