कल्याण : पूर्वेकडील चेतना शाळा ते नेवाळी नाका मलंग रस्त्याच्या ३० मीटर रुंदीकरणाच्या कामाला शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. मात्र, या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदाराविरोधात अनेक तक्रारी असल्याचे सांगत भाजपाच्या सदस्या उपेक्षा भोईर यांनी हरकत घेत दुसऱ्या कंत्राटदाराला काम देण्याचा विचार करावा, अशी मागणी केली. यावर हा रस्ता २७ गावांमधला महत्त्वाचा रस्ता आहे. कोणीही कंत्राटदार येथे काम करण्यास उत्सुक नाही. मग रिंग करणाऱ्या कंत्राटदारांना कामे द्यायची का?, अशा शब्दांत स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी या वेळी सुनावले. निविदा स्पर्धेत कमीत कमी दर भरणाऱ्या मे. रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्टस लिमिटेड कंपनीला या रस्त्याचे काम देण्यात आले आहे. या दृष्टीने प्रशासनाकडून मंजुरीसाठी प्रस्ताव शुक्रवारच्या स्थायी समितीच्या पटलावर दाखल करण्यात आला होता. प्रस्ताव चर्चेला येताच बहुतांश सदस्यांनी याला हिरवा कंदील दाखवला. परंतु, भाजपाच्या सदस्या भोईर यांनी संबंधित कंत्राटदाराविरोधात अनेक तक्रारी असल्याने त्याला अन्यत्र ठिकाणी काळ््या यादीत टाकल्याकडे लक्ष वेधले. जर अशा प्रकारची परिस्थिती असेल तर अन्य कत्राटदारांचा विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. या वेळी शिवसेनेच्या सदस्या रूपाली म्हात्रे यांनी २७ गावांमधील रस्त्यांच्या कामांना विरोध करू नका, असे मत व्यक्त केले. यावर माझा कामांना विरोध नाही, परंतु वादग्रस्त कंत्राटदाराला काम देण्याचा आग्रह का?, असा सवाल भोईर यांनी केला. भाजपाचे अन्य सदस्य राहुल दामले यांनीही तांत्रिक आणि कायदेशीर, अशी कोणतीही अडचण येणार नाही, याची खात्री करूनच मग निर्णय घ्या, अशी मागणी केली. यावर सभापती संतप्त झाले. केडीएमसी हद्दीतील २७ गावांमध्ये कोणीही कंत्राटदार काम करण्यासाठी येत नाही. त्यात एखादा कंत्राटदार काम करण्यासाठी तयार झाला आहे, त्याने नियमाप्रमाणे दाखल केलेल्या कमीत कमी दरावर त्याची निविदा मान्य करण्यात आली आहे. उर्वरित जे कंत्राटदार बाद झाले आहेत, ते रिंगमधील असल्याने त्यांना कामे द्यायची का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. आतापर्यंत यात दोघांचा बळी गेला आहे. त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे आहे. या मलंग रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आंदोलनेही झाली होती, त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे आहे, याकडेही अन्य सदस्यांनी लक्ष वेधले होते. (प्रतिनिधी)शाळा तोडली, पण गोठ्याला अभयबल्याणी प्रभागाच्या नगरसेविका नमिता पाटील यांनी त्यांच्या प्रभागात बेकायदा उभारलेल्या गोठ्याबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा मुद्दा सदस्य व सभागृह नेते राजेश मोरे यांनी उपस्थित केला. यावर सभापती म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना तसेच पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतरही शाळा तोडण्यात आली मग गोठ्याला अभय का दिले जातेय, असा संतप्त सवाल सभापती म्हात्रे यांनी केला.यावर माहिती घेऊन अहवाल सादर करतो, असे स्पष्टीकरण उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी या वेळी दिले. कारवाई करून अहवाल द्या, अशी मागणी सदस्यांनी केली. प्रशासनानेही सदस्यांच्या तक्रारीवर खुलासा करताना त्या कंत्राटदाराला काळ््या यादीत टाकलेले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. एमएसआरडीसी आणि एमएमआरडीए या विभागांकडेही चौकशी केल्याचे या वेळी सांगण्यात आले. तांत्रिक आणि कायदेशीर कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर संबंधित प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली.
...तर रिंग करणाऱ्यांना कामे!
By admin | Updated: April 1, 2017 05:40 IST