बदलापूर: लोकलची गर्दी किती जीवघेणी ठरू शकते याचा प्रत्यय आज बदलापुरात आला. लोकलच्या महिला डब्यात प्रचंड गर्दी असल्यामुळे दारावर लटकण्याची वेळ आलेल्या एका महिलेचा हात निसटल्याने ती खाली पडली त्यात ती गंभीर जखमी झाली आहे.
कविता जडये (41) असे या महिलेचे नाव असून ती बदलापूर स्थानकात सकाळी ९.१० मिनिटांची मुंबई लोकल पकडून निघाली होती. सकाळी प्रचंड गर्दी असल्यामुळे तिला लोकलच्या आतमध्ये शिरण्यास जागा मिळालीच नाही. त्यामुळे तिला दारावरच उभे राहावे लागले. मात्र लोकलमध्ये लोटालोटी जास्त असल्यामुळे गर्दीचा सर्व भार तिच्या अंगावर आला आणि तिचा हात निसटल्याने ती खाली पडली. बदलापूर प्लॅटफॉर्म संपल्यानंतरच लगेच ही घटना घडल्याने ती बाब प्रवाशांच्या लक्षात आली आणि लागलीच रेल्वे प्रशासनाच्या मदतीने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.