ठाणे - जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे यंदा अमरनाथ यात्रेला जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यात्रेसाठी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य असून, ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात प्रमाणपत्र घेण्यासाठी या काळात गर्दी होते. मात्र, शुक्रवारी केवळ एकाच व्यक्तीचा फिटनेस प्रमाणपत्रासाठी अर्ज आला होता.
बैसरन व्हॅलीजवळ दि. २२ एप्रिलला भीषण हल्ल्यात २७ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला, तर १६ गंभीर जखमी झाले. याचा धसका पर्यटकांनी घेतला. जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी आतापासूनच भाविक तयारी करतात. यात्रेसाठी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य आहे. मात्र, सिव्हिल रुग्णालयात हे प्रमाणपत्र घेणाऱ्यांची संख्या रोडावली आहे.
पहिल्या दिवशी ७५ तर हल्ल्यानंतर एकच अर्जसिव्हिल रुग्णालयात ८ एप्रिलपासून अमरनाथसाठी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्राची सोय केली आहे. पहिल्याच दिवशी ७५ अर्ज आले. मात्र, हल्ल्यानंतर ही संख्या घटली. शुक्रवारी केवळ एकाच व्यक्तीचा प्रमाणपत्रासाठी अर्ज आला होता. शासनाने भाविकांच्या सोयीसाठी मुंबईतील सर्व पालिका रुग्णालये, ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका रुग्णालये, सिव्हिल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र देण्याची सोय केली आहे.
ठाणे सिव्हिल रुग्णालयात यावर्षी आतापर्यंत ३०५ वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रासाठी अर्ज आले. यामध्ये २२४ पुरुष, तर ८१ महिलांचा समावेश आहे, तर गेल्या वर्षी १,१५६ अर्ज प्राप्त झाले होते. - डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल रुग्णालय