कल्याण : वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. परंतु, बाधितांना पूर्ण भरपाई देऊनच रुंदीकरणाची कामे करावीत, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांना देताना केडीएमसी हद्दीतील २७ गावांतील रस्ता रु ंदीकरणात बाधित होणाऱ्या कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्र वारी दिली. कल्याण-शीळ मार्गावरील चक्कीनाका ते नेवाळी मार्ग तसेच मानपाडा रोड या रस्त्यांच्या रु ंदीकरणाची कामे केडीएमसीने हाती घेतली आहेत. परंतु, या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या ग्रामस्थांचा त्याला आक्षेप होता. त्यासंदर्भात शिंदे यांनी मंत्रालयातील दालनात शुक्रवारी बैठक घेतली. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, आयुक्त ई. रवींद्रन, २७ गावांमधील नगरसेवक, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, सर्वपक्षीय संघर्ष समितीचे पदाधिकारी, एमआयडीसी तसेच एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते. शिंदे यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आक्षेप ऐकून घेतल्यानंतर पूर्ण भरपाई देऊनच रु ंदीकरणाची कामे करण्याचे निर्देश रवींद्रन यांना दिले. महापालिकेकडे बीएसयूपीची घरे आहेत. त्यात रस्ते बाधितांना स्थलांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून मंजुरी मिळवून देण्याची ग्वाही शिंदे यांनी या वेळी दिली. तसेच, महापालिका हद्दीत प्रकल्पग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर ट्रान्झिट कॅम्पची उभारणी करण्याचे निर्देशही त्यांनी आयुक्तांना दिले. या निर्णयामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)
भरपाई देऊनच रस्ता रुंदीकरण करा
By admin | Updated: December 24, 2016 03:01 IST