पथ चुकलेल्यांना वाटेवर आणण्याचे काम आपल्याकडील तुरुंगात सुरू आहे. हे झाले कैद्यांच्या बाबतीत, पण या यंत्रणेतही वावरून शिरजोर होणाऱ्या-तेथेही आपल्याच मस्तीत वावरणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे कारागृहे हायटेक करतानाच ‘दुनिया की कोई जेल हमें रोक नहीं सकती’ अशी भाषा करत पैशांच्या बळावर तेथे समांतर साम्राज्य उभारणाऱ्यांना हिसका देण्याची गरज आहे. ‘शोले’त हरिराम नाईला जाळ्यात ओढण्यासाठी जय आणि वीरू जेव्हा ‘पिस्तौल जेल में आ चुका है’ असं म्हणत ‘अंग्रेजों के जमाने का जेलर’ला चरचरीत चटका लावतात, तेव्हाच जेलमधील विसविशित यंत्रणेवरही बोट ठेवतात. जेलबद्दलचं आपलं मत तयार होतं ते अशा प्रसंगांतून... पण जेव्हा किरण बेदी यांनी तिहारच्या तुरूंगात कैद्यांना माणसात आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले तेव्हापासून जेलमधील सुधारणांचा गवगवा सुरू झाला. ‘गुन्हेगारांचे कसले कसले लाड सुरू आहेत,’ असं म्हणत तेव्हाही या प्रयोगांना नाकं मुरडली गेली होती. पण मानवाधिकारवाल्यांनी जेव्हा कैद्यातल्या माणसाला सुधारणांसाठी जगभर सुरू असलेल्या व्यवस्थांचे दर्शन घडवायला सुरूवात केली, तेव्हापासून हळूहळू का होईना, पण तुरूंगातील सुधारणांनी मोकळा श्वास घ्यायला सुरूवात केली. कैद्यांच्या हाताला काम, त्यांना कौशल्य शिकवणे, त्यांच्या वेगवेगळ््या परीक्षा, त्यांचे स्वास्थ्य, मनोरंजन, मानसिक स्थैर्य अशा अनेक अंगांनी या कामाला धुमारे फुटले. त्याचवेळी राजकीय नेत्यांच्या तुरूंगवाऱ्यांमुळे तेथे जातानाच त्यांच्या बिघडणाऱ्या प्रकृतीमुळे तुरूंगवासालाही ग्लॅमर येऊ लागले. नाहीतरी आपल्या सिनेमातील हिरोंनी ‘दुनिया की कोई भी जेल हमे ज्यादा देर तक अंदर नहीं कर सकती’ म्हणत तुरूंगवास हा औटघटकेचा असतो हे दाखवून दिलं होतच. आपल्या पिळदार बाहुंनी मी मी म्हणणाऱ्या जेलची सलाखें वाकवून आणि उंचच उंच भिंतीवरून उड्या घेत त्यांनी जेल म्हणजे माफक अडथळ््यांची शर्यत असल्याचं चित्रही उभं केलं होतं. जेव्हा जेलमध्ये टीव्ही पाहणाऱ्या, तेथेही एसीत बसलेल्या, मस्त अंथरूण-पांघरूण पसरून अंग चेपून घेणाऱ्या, तेथे अड्डा जमवणाऱ्या, मोबाईल, चमचमीत खाणं, अंमली पदार्थ, सिगारेटी-मद्य, व्यायामाची साधनं यांचाही सुकाळ असेल्या जेलची बिहारी वर्णनं वाचनात आली, तेव्हा या व्यवस्थांतील भेगा ठसठशीतपणे समोर आल्या. कैद्यांचे गट, तुरूंगांत गेलेल्या कैद्यांकडील पैसा-त्याचं वजन यावर तिथल्या सुविधा कसा हात सैल सोडतात त्याची प्रचिती येऊ लागली. तुरूंगवास भोगूनही गुटगुटीत झालेले-तब्येत राखून असलेले टुकटुकीत कैदी हसतहसत बाहेर पडून जेव्हा चाहत्यांना दर्शन देऊ लागले तेव्हा या व्यवस्थेचे वाभाडे निघाले. ‘दाम करी काम’ ही म्हण प्रत्यक्षात आलेली पाहायला मिळाली आणि तरूंगातील या दुसऱ्या पद्धतीच्या सुधारणांची गरज किती आहे, याचे महत्त्व पटू लागले. त्या सुधारणांनाही सुरूवात झाली. ‘जगाच्या पाठीवर’ची गीते लिहिताना गदिमांनी जगालाच बंदिशाला म्हटलं होतं. ‘कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला’ असं वर्णनही केलं होतं. त्या पथ चुकलेल्यांना वाटेवर आणण्याचं काम सध्या तुरूंगांत सुरू आहे. पण प्रश्न आहे, तो या व्यवस्थेत राहून प्रत्येक गोष्टीची किंमत लावणाऱ्यांना वेसण घालणाऱ्यांचा. पैशाच्या बळावर काहीही होऊ शकतं असा भ्रम निर्माण करत समांतर व्यवस्था राबवणाऱ्यांचा. कल्याणच्या घटनेने तुरूंगातील पळवाटा पुन्हा एकदा दाखवून दिल्या आहेत. सुरक्षेच्या भिंतींना पडलेली बीळं कायम असल्याचा प्रत्यय दिला आहे. ही बीळं उघड झाली ते एका अर्थानं बरं झालं. नाही तर ती बुजवायची आहेत, हे कुणाच्या लक्षातच आलं नसतं! केवळ जाडजूड भिंती आणि उंच कुंपणे, डोळ्यांत तेल घालून टॉवरवर पहारा देणारे पोलीस आताच्या काळात बंदोबस्तासाठी पुरेसे नाहीत; हे लक्षात आल्याने सीसीटीव्ही, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, मोबाइल जॅमर, कैद्यांची तपासणी, स्कॅनर, स्वच्छतागृृहांच्या बांधणीत सुधारणा यांचा वापर सुरू झाला. कारण, तुरुंगातील सुधारणांच्या या कल्याणकारी दुनियेत काही कैद्यांतील माणूस कधीच जागा होत नाही, उलट त्यातील पशू उफाळून येतो. त्यामुळे त्यांना वेसण घालण्याची गरज पुढे आली. त्यासाठी सुधारणांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. पण कैद्यांची संख्या, कामांची सरकारी गती आणि व्यवस्थेला फारसे गंभीरपणे न घेण्याची वृत्ती असलेल्यांची संख्या अधिक असल्यामुळे ते तुलनेने तोकडे पडताहेत. त्यात सातत्य आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांनी ते रेटून नेल्याने तुरुंगातील तड्यांची भगदाडे झालेली नाहीत, हीच त्यातल्या त्यात दिलाशाची बाब. महिला कैद्यांना दिली जाणारी कामे - शिवणकाम, ब्युटीपार्लर, अगरबत्ती बनवणे, संगणक प्रशिक्षण, पाकिटे बनविणे, कागदी फुले-एम्ब्रॉयडरी, क्रोशा-ग्रीटिंग. अन्य उद्योग - हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, शिवणकाम, चर्मकला, बेकरी, लोहारकाम, रसायन उद्योग, शेती. शेतीतील उत्पादन - पालेभाजी, फळभाजी, तांदूळ, गहू, ज्वारी, कडधान्य, सोयाबीन, ऊस, दूध. शेतीतील उत्पन्नात पैठणचे कारागृह अग्रेसर. त्यांनी गेल्या वर्षी ७७ लाख ३२ हजार ९२३ रूपयांचे उत्पन्न मिळवले. येरवडा कारागृहाने गेल्यावर्षी कारखाना उत्पादनातून तीन कोटी ७५ लाख ७५ हजारांचे उत्पन्न मिळवले. एका कैद्यावर वर्षाकाठी होणारा खर्च (गेल्या वर्षीचा अंदाज) - ७१,४८३ रूपये.
जो तो पथ चुकलेला
By admin | Updated: June 12, 2016 01:12 IST