भिवंडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रिपल तलाक कायदा मंजूर करून मुस्लीम महिलांना असा कोणता न्याय दिला, हे मी स्वत: मुस्लीम असून मला आजही समजले नाही. ट्रिपल तलाक कायद्यावर ठाम असलेल्या मोदींना मुस्लिमांची दु:खे आजही दिसली नाहीत. केवळ प्रसिद्धीसाठी ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर मोदी बोलतात. मुस्लीम समाजात एक व्यक्ती अनेक महिलांशी विवाह करते, असा समज मोदींचा झाला आहे; मात्र जो एकाच पत्नीने त्रासलेला आहे, तो दुसरीच्या नादी काय लागणार, अशी टीका भिवंडीतील जाहीर सभेत सोमवारी करताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची जीभ घसरली.
ओवेसींनी सभेत भाजप सरकारवर निशाणा साधला. देशासह राज्यात अनेक समस्या असून भाजप सरकार केवळ देशप्रेम आणि कलम ३७० बद्दलच बोलत असल्याने राज्यातील मूळ समस्यांना बगल देत असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण द्यायचे, तर दुसरीकडे मुस्लिम समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे, अशी नीती भाजप सरकारने अवलंबली असून सबका साथ सबका विकास म्हणत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारला मुसलमानांचा विकास दिसत नाही का, असा सवालही त्यांनी केला.
जीएसटी, नोटाबंदीमुळे देशाचा जीडीपी दर पाच टक्क्यांवर आला असून देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. तरुण बेरोजगार झाला आहे, तर मुक्त बाजार करारामुळे येथील यंत्रमाग व्यवसायाबरोबरच इतर व्यवसायांचे कंबरडेही मोडणार आहे. त्यामुळे देशात मंदीची शक्यता आहे, अशी शंकाही ओवेसी यांनी व्यक्त केली. भिवंडी महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता असूनही शहराची दुरवस्था झाली आहे. देशात मॉब लिंचिंग होत नाही, असा दावा करणारे सरसंघचालक मोहन भागवत यांना तबरेज अन्सारीचा विसर पडला असावा, अशी टीकाही ओवेसी यांनी याप्रसंगी केली.