अनिकेत घमंडी / डोंबिवलीहिंदू आणि मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड येथे भाविकांच्या सोयीसाठी फ्युनिक्युलर रेल्वे उभारण्याचा प्रकल्प २००८ मध्ये मी आणला होता. त्यावेळी मी अंबरनाथ मतदारसंघाचा आमदार होतो. तेव्हा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राजकारणात जन्म तरी झाला होता का? आधी त्यांनी हा प्रकल्प कधी सुरू झाला, का बंद पडला, तो कधी पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते, अशी या प्रकल्पासंदर्भात सविस्तर माहिती घेऊन त्याची उत्तरे द्यावीत. मग, वास्तव समोर येईल, असा टोला आमदार किसन कथोरे यांनी शिंदे यांना लगावला.खासदार डॉ. शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी अचानकपणे प्रसिद्धिमाध्यमांना हाताशी घेत शनिवारी मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पाचा पाहणी दौरा केला, हे हास्यास्पद आहे. सात वर्षांनंतर त्यांना कशी जाग आली? हा प्रकल्प म्हणजे काही डोंबिवलीच्या बागेतील मोराची गाडी नाही. त्यासाठी कोणाकडून परवानगी काढायला लागते, ती कशी मिळाली? कधी मिळाली, कोर्टात कोण होते? त्याचा निकाल काय लागला होता, याचीही माहिती त्यांना नसेल. ती त्यांनी तत्कालीन शिवसेनेचे संपर्कप्रमुख व आताचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घ्यावी. दौरा करताना समांतर रस्त्याबाबत त्यांनी भाष्य केले नाही, त्यांना माहितीही नसेल. काही ठिकाणी पक्षीय राजकारण बाजूला ठेवणे आवश्यक असते. त्यातील हा प्रकल्प असून माझ्यासाठी तो अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे, असे कथोरे म्हणाले. मात्र, शिवसेनेने तसे न करता युतीधर्म तोडल्याची खंत कथोरे यांनी व्यक्त केली.मी अंबरनाथ मतदारसंघाचा आमदार असताना २००८ मध्ये हा प्रकल्प आणला होता. मलंगगडचा परिसर इको-सेन्सेटिव्ह आहे. त्यासाठी इको-टुरिझम खात्याकडून अडीच हेक्टर जमीन मिळवली. असा हा देशातील पहिला नसला, तरी महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे. त्यानंतर, आता सात वर्षांनंतर शिंदे यांना जाग कशी आली. प्रकल्पासाठी ४० कोटींचा निधी अपेक्षित होता, तो आता ८० कोटींवर कसा गेला? ज्या कंपनीला नेमले होते, त्यांना कोणी व का त्रास दिला? याबद्दल उघडपणे बोललो, तर काहींची अडचण होऊ शकते, असेही कथोरे म्हणाले.
खासदारांचा राजकारणात जन्म तरी झाला होता का?
By admin | Updated: April 24, 2017 23:55 IST