उल्हासनगर : पाण्यासह अन्य सुविधा हव्या असतील तर थकित मालमत्ता कर भरा. अन्यथा पाण्यासह सांडपाणी जोडणी खंडित करण्याबरोबरच मालमत्ता जप्त करून लिलावात काढण्याचा इशारा महापालिकेने दिल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, शिवलीला इमारतीवर कारवाई करून प्रवेश गेटवरील कचरा न उचलता आतमध्ये टाकण्यात आला. आयुक्त राजेंद्र निंबाळकर, उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी थकित मालमत्ता कराच्या वसुलीसाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. थकबाकीदारांची यादी बनवून विविध पथकांद्बारे वसुली करण्यास सुरुवात केली आहे. २५ लाखापेक्षा अधिक थकबाकीदाराच्या घरी आयुक्त स्वत: जाणार असून त्याखालील थकबाकीदारांकडे उपायुक्तांसह पथक प्रमुखांनी जाण्याचा निर्णय घेण्यात आला. नोटीसा पाठवूनही थकबाकी भरत नसलेल्या नागरिकांच्या मालमत्ता जप्त करून लिलावात काढण्याचा धडाका पालिकेने सुरु केला आहे. वसुली अधिकारी व मुख्य लेखा अधिकारी दादा पाटील यांनी २५० पेक्षा जास्त मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. कॅम्प नं-१ परिसरातील शिवलीला इमारतीच्या सचिवांना नोटीस देऊनही मालमत्ता कर भरला नव्हता. उपायुक्त जमीर लेंगरेकर, युनिट प्रमुख विनोद केणे यांच्या पथकाने इमारतीला भेट दिली असता, प्रवेशद्बारासमोर जमा झालेला कचरा टाकलेला दिसला. पाणी खेचण्यासाठी पंप बसविले होते. सांडपाणी उघड्यावर सोडून दिले आहे. लेंगरेकर यांनी पाणी खेचण्यासाठी ठेवलेले पंप बंद करण्यास सांगितले. तसेच प्रवेशद्बारासमोर कचरा टाकल्याप्रकरणी ५ हजाराचा दंडही ठोठावला. मनपाकडून सुविधा हव्या असल्यास मालमत्ता कर भरा. असे सुनावत प्रवेशद्बारासमोरील कचरा इमारतीच्या आत ढकलण्यात आला. २४ नोंव्हेबरपर्यंत ५०० व १००० रूपयांच्या जुन्या नोटा पालिका मालमत्ता कराच्या स्वरुपात स्वीकारणार आहेत. नागरिकांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन लेंगरेकर यांनी केले. पाच दिवसात २६ कोटीपेक्षा अधिक वसुली झाली आहे. थकित करापोटी पालिकेने डॉल्फिन हॉटेलवर मंगळवारी कारवाई केली. (प्रतिनिधी)
सुविधा हव्या? मालमत्ता कर भरा!
By admin | Updated: November 16, 2016 04:19 IST