डोंबिवली : आरती सकपाळ या महिलेच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या श्रीनिवास मडीवाल याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने रविवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पश्चिमेतील कोपर रोड येथील कुमार बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या आणि पूर्वी कल्याणच्या बारमध्ये वेटरचे काम करणाऱ्या आरतीचा (वय ४७) मृतदेह राहत्या घरात साडीने गळा आवळलेल्या अवस्थेत आढळला होता. आरतीच्या मोबाइलचे डिटेल्स तपासले असता तिच्यासोबत बारमध्ये वेटरचे काम करणाऱ्या श्रीनिवासचे दररोज बोलणे सुरू होते, अशी माहिती समोर आली. अखेर, कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला शनिवारी दुपारी कल्याणच्या रेल्वेपुलावर अटक केली. आरतीची हत्या पैसे आणि अनैतिक संबंधांतून केल्याची त्याने कबुली दिली आहे. अधिक तपासासाठी विष्णूनगर पोलिसांनी रविवारी न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यावर त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
------------------------------------------------------