कल्याण : राजस्थानमधील एका अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमाचे नाटक करून तिच्यासह चेन्नईला पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या भामट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. सादिक खान हे आरोपीचे नाव आहे. तो विवाहित असून त्याला एक मुलगादेखील आहे.
अल्पवयीन मुलगी आणि सादिक हे दोघेही राजस्थानच्या जलोर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अल्पवयीन मुलीला तो रेल्वेने कल्याणमार्गे चेन्नईला पळवून नेत होता. याबाबतची तक्रार राजस्थानमधील स्थानिक पोलिसांना मिळताच त्यांनी कल्याणच्या लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधून वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी तत्काळ पोलीस उपनिरीक्षक मोहन घास्टे यांना कल्याण स्थानकावर पाठवले. त्यावेळी संबंधित लांबपल्ल्याची एक्सप्रेस कल्याण स्थानकामध्ये थांबली होती. घास्टे आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार वातानुकूलित डब्याचा शोध घेतला असता तेथे सादिक हा अल्पवयीन मुलीसह आत बसला होता. या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान हे दोघे राजस्थानमधून पलायन करून अहमदाबादला आले आणि तेथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. अहमदाबादहून ते चेन्नईला जात होते. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर तातडीने ही माहिती राजस्थान पोलिसांना देण्यात आली. रविवारी राजस्थानचे पोलीस कल्याणमध्ये आल्यानंतर त्यांना कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
---------------------