ठाणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिल्यानंतर ठाण्यातही पोलीस आणि महापालिकेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने ठाण्यातील १० हॉटेलांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, पालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्या आदेशाने पाच बार सील करण्याची कारवाई पालिकेच्या पथकांनी सोमवारी रात्री केली. या कारवाईने हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहे.
कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याबाबत ठाणे शहरातील हॉटेल, बार आणि रेस्टॉरन्ट चालकांना पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सीआरपीसी कलम १४९ नुसार कोरोनासंबंधी नियमांचे उल्लंघन न करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न बाळगणे आणि सॅनिटायझरची उपलब्धता न ठेवता हॉटेलमध्ये गर्दी करणाऱ्या ठाणे शहरातील १० हॉटेल चालकांविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नियमांचे उल्लंघन, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ठाणेनगर पोलिसांनी डी कृष्णा स्नॅक्स सेंटरचे युधिष्ठिर पोई आणि मॅग्नम रेस्टॉरंटचे सुरेंद्र शेट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नौपाडा पोलिसांनी अँटिक बारचे सुरेश कुंदर आणि रघुवेल बारचे श्रेयस राय तसेच राबोडी पोलिसांनी हनिकॉम बारचे शेखर चव्हाण यांच्यावर कारवाई केली. कळवा आणि मुंब्रा पोलिसांनीही प्रत्येकी दोघांवर कारवाई केली असून, डायघरमध्येही बार चालक श्रीनिवास शेट्टी अशा एकूण नऊ जणांविरुद्ध कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
........................
महापालिकेनेही केली पाच बारवर कारवाई
सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायजर वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच रेस्टॉरंट बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करूत ते पाचही बार सोमवारी रात्री उशिरा सील केले. आयुक्त डॉ. शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या पाचही आस्थापनांवर गुन्हे दाखल केले जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही, असा इशारा शर्मा यांनी दिला आहे.
.............