भिवंडी : १ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा वरील नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. भिवंडी महापालिकेच्या वतीने पालिका क्षेत्रात कामतघर भाग्यनगर , खुदाबक्ष हॉल व इंदिरा गांधी रुग्णालय अशा तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. मात्र या लसीकरण केंद्रांकडे भिवंडीकरांनी पहिल्याच दिवशी पाठ फिरविल्याने अत्यल्प प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या वतीने गुरुवारी विशेष लसीकरण सत्र ठेवले होते. मात्र या तिन्ही लसीकरण केंद्रांवर ४५ हून अधिक वयोगटातील फक्त २८५ नागरिकांनी लसीकरण करून घेतले. तर पोलीस, पालिका व वैद्यकीय आरोग्य सेवक यांच्यासह फक्त ५१७ जणांनी लस घेतली.
सरकारकडून भिवंडी महापालिकेस १० हजार डोस उपलब्ध करून दिले असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. आर. खरात यांनी दिली. कामतघर भाग्यनगर लसीकरण केंद्र येथे १७६ ,खुदाबक्ष सांस्कृतिक हॉल लसीकरण केंद्र येथे १३० आणि इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय येथे २११ असे एकूण ५१७ महिला व पुरुषांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला असल्याची माहिती खरात यांनी दिली. दरम्यान भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी शहरातील लसीकरण केंद्रांना दुपारी भेट देऊन पाहणी केली. येथील सुविधा, समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.