वसई : विविध कार्यक्रमांचे आयोजन करून वसई-विरार परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वालीव येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने मोटारसायकल रॅली काढली होती. या वेळी नगरसेवक प्रफुल्ल पाटील आणि नगरसेविका उषा ठाकूर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. नगरसेवक सुनील आचोळकर यांच्या नेतृत्वाखाली वसई किल्ल्यातून मशाल रॅली काढण्यात आली. शिवाजी महाराजांच्या काळात वापरण्यात आलेल्या शिवकालीन दुर्मीळ शस्त्रांचे विरारमध्ये मनवेलपाडा येथे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तलवार, ढाल, तोफगोळे, कट्यार, चाकू, भाले, जांभिया, वाघनखे, बिछवा, गुप्ती यासह अन्य दुर्मीळ शस्त्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती तयार करून समोर शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली आहे. बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन तीन दिवस खुले राहणार आहे.पालघर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पालघर शहरामधून युवा ब्रिगेडच्या वतीने शहरात मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. डोक्यावर फेटे आणि हातात भगवे झेंडे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत शेकडो तरुण या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील विविध भागांत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली़. विक्रमगड तहसील कार्यालयात व तालुका पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला़ या वेळी तहसीलदार सुरेश सोनवणे, महसूल अव्वल कारकून अरुण मुर्तडक, निवासी तहसीलदार आयुब तांबोळी व कर्मचारीवृंद आदी उपस्थित होते़ महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेबु्रवारी) या तारखेप्रमाणे साजरी करण्याचे ठरवल्याने विक्रमगड, पाटीलपाडा येथील चौकात शिवभक्त कमिटीचे अध्यक्ष पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडप उभारून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले़ त्याचप्रमाणे, विक्रमगड ग्रामपंचायत कार्यालयात शिवछत्रपती सभागृहात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सरपंच दत्ता भंडागे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला़ दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शिवजयंती साजरी करण्यात आली़ दरम्यान, तालुक्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली़डहाणू : डहाणू तालुक्यातील कासा शिव मंदिर, चिंचणी, दांडेपाडा तसेच इतर परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. दांडेपाडा युवा मांगेला संस्थेतर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून पालघरचे नवनिर्वाचित आमदार अमित घोडा उपस्थित होते.तर, शिवचरित्र व्याख्याते सौरभ देशमुख यांनी मार्गदर्शन केले. आ. अमित घोडा यांनी दीपप्रज्वलन करून शिवरायांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आ. अमित घोडा यांनी ग्रामीण भागातील आदिवासी तसेच इतर नागरिकांच्या समस्या तसेच ग्रामीण भागातील शैक्षणिक, आरोग्य व शासकीय सोयीसुविधा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असून दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांचे स्वप्न साकार करून जनतेच्या समस्यांवर अधिक भर देऊन लोकांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळेस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. या वेळेस या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य विपुला सावे, चारोटीचे उपसरपंच प्रणय मेहेर, तालुकाप्रमुख संतोष वझे, सौरभ मोरे, हेमंत धर्ममेहेर तसेच मंडलाचे अध्यक्ष हितेश राऊत, सदस्य प्रदीप दांडेकर, निलेश धानमेहेर व इतर मंडळाचे सदस्य, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. जव्हार : शिवजयंतीनिमित्त जव्हार तालुक्यातील शिवप्रेमी व जव्हार नगरपरिषद यांच्या सहकार्याने शुक्रवारी जव्हारमधील गांधी चौक येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज शूरवीर कसे झाले, महाराज होते कसे, त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन कसे केले, याविषयी माहिती देण्यासाठी इतिहास विश्लेषक शहापूर येथील अमर राऊत तसेच जव्हारमधील प्रदीप खवले सर यांना बोलवले होते. या विश्लेषकांनी येथील तरुणांना शिवाजी महाराजांचा इतिहास, हिंदवी स्वराज्याविषयी माहिती देण्यात आली.च्तलासरी : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज तलासरीत उत्साहात पार पडली. तलासरीमधील राम मंदिरापासून शिवरायांच्या प्रतिमेची तलासरी गावातून मिरवणूक काढण्यात आली. आ. पास्कल धनारे यांनी शिवमूर्तीला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली.च्जिल्हा परिषद सदस्या गीता धामोडे, पंचायत समिती सदस्य सुनील निकुंभ, प्रकाश सांबर, लक्ष्मण वरखंडे इ.सह मोठ्या संख्येने तलासरीतील नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते.च्शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक मिरवणुकीच्या अग्रस्थानी होते. या वेळी तलासरी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.रक्तदान शिबिरजव्हार : शिवजयंतीनिमित्त पंचायत समिती, जव्हार येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी जव्हार पंचायत समिती गटविकास अधिकारी श.शा. सावंत, उपसभापती सीताराम पागी यांनीही स्वत: रक्तदान केले. पंचायत समिती कर्मचारी, सर्व ग्रामसेवक, पंचायत समिती सदस्य यांनी स्वत:हून रक्तदान करून एकूण ३२ बॅगा रक्त दिले आहे.
शिवजयंतीनिमित्त वसईत विविध कार्यक्रम
By admin | Updated: February 20, 2016 01:47 IST