मुंबई : यूपीएससी मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने दिल्लीत क्षमता विकास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय दिल्लीच्या जुन्या महाराष्ट्र सदनात करण्यात आली असून, येथे १ मे ते १ जून या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी अभिरूप मुलाखतीच्या १0 सत्रांचे आयोजन केले आहे.यूपीएससीमार्फत विविध पदांसाठी आॅगस्ट २०१४ मध्ये पूर्व परीक्षा तर डिसेंबर २०१४ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. १३ एप्रिल रोजी मुख्य परीक्षेचा निकाल घोषित झाला. या परीक्षेत ३ हजार ३०० विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या अंतिम टप्प्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. मुलाखतीचा हा टप्पा २७ एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यानुसार नवी दिल्ली येथील जुन्या महाराष्ट्र सदनात विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. या क्षमता विकास कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक म्हणून अमरावती येथील शासकीय भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी तसेच निवासासाठी विद्यार्थ्यांना ०११-२३३८४२८९ व ०११-२३३८०३२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. (प्रतिनिधी)
यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिल्लीत मिळणार प्रशिक्षण
By admin | Updated: April 25, 2015 04:53 IST