अंबरनाथ : रेल्वे स्थानकातील पूर्व भागात दुचाकींच्या पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. रेल्वेस्थानकात येणाऱ्या मार्गावरच अनेक दुचाकी उभ्या केल्या जातात. तिकीट घरापर्यंत या गाड्या उभ्या राहत असल्याने रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्किंगचा आता रेल्वे प्रवाशांना त्रास होत आहे. अंबरनाथ स्थानक परिसरात ज्याप्रमाणे बेकायदा पार्किंग मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचप्रमाणे आता रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीसमोरील बेकायदा पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. रेल्वेस्थानकात थेट गाड्या येऊ नये याच्या सुुरक्षेसाठी लोखंडी खांब बसविण्यात आलेहोते. मात्र ते खांब आता काढण्यात आल्याने अनेक रेल्वे प्रवासी आणि काही रेल्वे कर्मचारी आपली दुचाकी गाडी ही थेट तिकीट खिडकीच्या आवारातच उभ्या करीत आहेत. रेल्वेच्या आवारातील मोकळ्या जागेवर प्रवाशांना वावरण्यासाठी जागा ठेवली आहे. मात्र त्याच जागेवर आता मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या राहत असल्याने त्याचा त्रास रेल्वे प्रवाशांना होत आहे. सकाळी आणि सायंकाळी घाईघाईने निघणाऱ्या प्रवाशांना या गाड्यांची मोठी अडचण होते आहे. गाड्या उभ्या करण्यासाठी काही खाजगी कंत्राटदार प्रवाशांकडून चुकीच्या पध्दतीने पैसे घेत असल्याचे समोर येत आहे. (प्रतिनिधी)
पार्किंग स्थानकापर्यंत
By admin | Updated: March 14, 2017 01:22 IST