कल्याण : कल्याण रेल्वेस्थानकात प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी रेल्वे प्रशासन व पोलिसांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी समस्या दूर करण्यावर चर्चा केली. याप्रसंगी त्यांनी रेल्वे पोलिसांना आमदार निधीतून दोन संगणक दिले जातील, असे सांगितले.
कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दूल आणि रेल्वे व्यवस्थापक भरतकुमार जैन या भेटीदरम्यान उपस्थित होते. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण ते कसारा, कल्याण ते कर्जतदरम्यानची स्थानके येतात. या हद्दीतील प्रवाशांचे अपघात, लुटीच्या घटना पाहता, कल्याण रेल्वे पोलिसांवर कामाचा ताण आहे; परंतु कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात संगणक नसल्याने कामाला गती देता येत नाही. नोंदी ठेवता येत नाहीत, ही बाब चर्चेवेळी पुढे येताच भोईर यांनी तातडीने आमदार निधीतून दोन संगणक रेल्वे पोलीस ठाण्यास देण्याचे मान्य केले आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी तक्रार निवारण केंद्र सुरू करावे. कल्याण स्टेशन परिसर आणि रेल्वेस्थानक सुसज्ज करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून काम सुरू आहे. प्रवाशांच्या समस्यांचा निपटारा व्हावा, यासाठी भोईर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रेल्वे अधिकारी आणि रेल्वे पोलिसांशी चर्चा केली.
------------------