विश्वस्त आणि उपाध्यक्षांना व्यासपीठावर बोलवले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:55+5:302021-09-27T04:44:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालयात पार पडलेल्या १२८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मानापमान नाट्य घडले. कार्यकारी ...

Trustees and vice presidents were not called to the podium | विश्वस्त आणि उपाध्यक्षांना व्यासपीठावर बोलवले नाही

विश्वस्त आणि उपाध्यक्षांना व्यासपीठावर बोलवले नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालयात पार पडलेल्या १२८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मानापमान नाट्य घडले. कार्यकारी विश्वस्त सोडून इतर विश्वस्त आणि उपाध्यक्ष यांना व्यासपीठावर तत्कालीन अध्यक्षांनी आमंत्रित न केल्यामुळे संस्थेचे विश्वस्त दा.कृ. सोमण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो. संस्थेच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे. माझी तत्कालीन अध्यक्ष यांच्यावर प्रचंड नाराजी आहे, असे सोमण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

मराठी ग्रंथ संग्रहालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी संस्थेच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात पार पडली. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष विद्याधर वालावलकर आणि कार्यकारी विश्वस्त वासंती वर्तक हे दोघेच व्यासपीठावर होते. उर्वरित विश्वस्त आणि उपाध्यक्ष हे मात्र व्यासपीठाच्या खाली खुर्चीवर बसून होते. सर्वसाधारण सभेत विश्वस्त आणि उपाध्यक्ष व्यासपीठावर असतात, अशी परंपरा आहे. आतापर्यंत हीच प्रथा सुरू होती. परंतु, यंदा अध्यक्ष आणि कार्यकारी विश्वस्त दोघेच व्यासपीठावर बसल्याने उर्वरित विश्वस्त आणि उपाध्यक्ष यांचा अपमान झाल्याचे सांगत, याबद्दल सोमण यांनी खेद व्यक्त केला. ही कोणती नवीन प्रथा, असा सवाल उपस्थित केला. सकाळी ११.३० वा. सभेतून सोमण यांनी काढता पाय घेतला. मतदान मात्र केले, असेही ते म्हणाले. चुकीची प्रथा पडू नये म्हणून मी वालावलकर यांच्याकडे मेसेजद्वारे झालेल्या घटनेचे दुःख व्यक्त केल्याचे सोमण म्हणाले. ही संस्था सार्वजनिक आहे. खाजगी वा कोणाच्या मालकीची नाही, असा संताप व्यक्त करीत सोमण म्हणाले, मी हा निषेध अपमानित झालेले विश्वस्त आणि उपाध्यक्ष यांच्या वतीने व्यक्त करीत आहे. तत्कालीन अध्यक्षांनी आम्हाला कोरोनाचे कारण देत वर बसविले नाही. पण, व्यासपीठावर भरपूर जागा होती. ही चुकीची प्रथा पुढे चालू नये, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो, असे सोमण म्हणाले.

-----------

चौकट

तत्कालीन अध्यक्ष आणि त्यांच्या समितीने सोशल डिस्टन्सिंगसाठी हा निर्णय घेतला होता आणि त्यामुळे सोमण यांचे ८१ वय पाहता तो निर्णय योग्य वाटला. सोमण हे ज्येष्ठ मार्गदर्शक असल्याने अपमान करणे, असे मनातही येणार नाही. सोमण यांना वाईट वाटले, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते.

- वासंती वर्तक, कार्यकारी विश्वस्त, मराठी ग्रंथ संग्रहालय

Web Title: Trustees and vice presidents were not called to the podium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.