मुंबई : गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या अवयवदानाच्या जनजागृतीमुळे अवयवदानाचे प्रमाण वाढते आहे. अवयव प्रत्यारोपित करत असताना बऱ्याचदा ग्रीन कॉरिडोर करून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेले जाते. बुधवारी दुपारी ठाणे ते दादर या मार्गावर ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून मुंबईतील एका खासगी रुग्णालयाने २५ मिनिटांत यकृत आणले. देशात पहिल्यांदाच अवयव लोकलने आणण्यात आल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.ठाणे येथील ५३ वर्षांच्या व्यक्तीचा अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्या व्यक्तीला ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी या व्यक्तीला ब्रेनडेड घोषित केले. या व्यक्तीने अवयवदानाकरिता मृत्यूपूर्व नोंदणी केली होती. त्यानुसार यकृत दान करण्यात आले.हृदयावर शस्त्रक्रिया झाली असल्याकारणाने हृदय दान करण्यास अपात्र ठरले. या व्यक्तीचे यकृत परळ येथील खासगी रुग्णालयातील एका गरजू व्यक्तीला प्रत्यारोपित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.लोकलने नेण्यात आलेल्या यकृताविषयी रेल्वे प्रशासनाला माहिती देण्यात आली नव्हती. ऐन वेळेस रुग्णालय प्रशासनाच्या काही व्यक्तींनी फोनवरून संपर्क साधून ही परवानगी घेतली.- अनिलकुमार जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे प्रशासनलोकलमधून यकृत नेण्यात आले, त्याविषयी जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीला कल्पना नाही. मात्र अवयव कोणत्या वाहनाने नेण्यात यावे, यावर समितीचे निर्बंध नाहीत. परंतु, कोणत्याही वाहनाने नेताना योग्य त्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केला पाहिजे. त्यात समन्वयक, संबंधित यंत्रणेची परवानगी, त्यांचे समन्वयक, अवयवाचे व्यवस्थापन, स्वच्छता या सर्व बाबी विचारात घेतल्या पाहिजेत.- डॉ. भरत शहा, सदस्य, जिल्हा अवयव प्रत्यारोपण समिती (झेडटीसीसी)
ठाणे ते दादर यकृताचा लोकलने प्रवास; पहिल्यांदाच अवयव लोकलने नेल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 02:28 IST