सदानंद नाईक, उल्हासनगर : शहराच्या गजबजलेल्या नेहरू चौकातील एका इमारतीच्या फ्लॅट मधील महिला जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी धाड टाकून ८ महिलांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम जप्त केली असून ठाणे, कल्याण, ग्रामीण परिसरातील महिला येथे जुगार खेळण्यासाठी आल्याचे उघड झाले. या महिलांचे पती उधोगपती व व्यापारी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, नेहरू चौकातील क्लासिक इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भतानी नावाची ६० वर्षाची महिला खास महिलांसाठी जुगार अड्डा चालवीत असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी रात्री साडे आठ वाजता पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगार खेळणाऱ्या ८ महिलांना अटक केली. त्यांच्याकडून ३५ हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी दिली. गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या महिलांची चौकशी करून वैयक्तिक जामीनावर सुटका करण्यात आली. सर्वच महिलांचे वय ५० च्या पुढे असून जुगार अड्डा चालविणाऱ्या भतानी नावाच्या महिलेचे वय-६० वर्ष तर बुधवानी नावाची महिला ७० वर्षाची आहे. बहुतांश महिलांचे पती नामचिन उधोगपती व व्यावसायिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
जुगार अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी आलेली कानडे नावाची महिला कळवा ठाणे येथील रहिवासी आहे. कटारिया नावाची महिला वरप कल्याण तर वाधवा नावाची महिला खडकपाडा कल्याण येथील राहणारी आहे. इतर महिला शहरातील विविध भागातील राहणाऱ्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार पोलिसांनी महिला जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली असून असे महिला जुगार अड्डे बंद घरात व फ्लॅट मध्ये सुरु आहेत. त्यांची भनक पोलिसांना लागत नाही. असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. क्लासिक इमारतीचे नागरिक व शेजारील नागरिक याबाबत काहीएक बोलण्यास तयार नाहीत. यापूर्वी कॅम्प नं-१, राम मॉलिशवाले परिसरात महिलांना जुगार अड्ड्यावर कारवाई झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महिलांच्या मानसन्मानाला धक्का बसणार
महिला जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या ८ महिलांवर गुन्हा दाखल झाला. महिलांचे वय ५० पुढील असल्याने, त्यांची नावे प्रसिद्ध करू नका. त्यांच्या मानसन्मानाला ठेच पोहचून जीवाचे बरे वाईट करण्याची शक्यता आहे.