ठाणे : एका ६५ वर्षीय गतिमंद वृद्धेवर पाणी मागण्याच्या बहाण्याने बलात्कार करणाऱ्या आराेपी माेहम्मद गुड्डू ऊर्फ दिलकाश शेख (वय ४०) या सुरक्षा रक्षकाला दहा वर्षे सश्रम कारावासाची आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने बुधवारी सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षाही आराेपीला भाेगावी लागणार आहे.
ठाण्यातील नाैपाडा भागात राहणारी ही वृद्ध महिला ३ नाेव्हेंबर २०२१ राेजी दुपारी एकच्या सुमारास घरात एकटीच हाेती. त्यावेळी ती वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने तिच्याकडे पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरकाव केला. त्यानंतर त्याने बळाचा वापर करीत तिच्यावर बलात्कार केला हाेता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध नाैपाडा पाेलिस ठाण्यात विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला हाेता. मूळ बिहारमधील या आराेपीला तत्कालीन सहायक पाेलिस निरीक्षक एम. पी. साेनवणे यांच्या पथकाने ४ नाेव्हेंबर २०२१ राेजी अटक केली हाेती. याच खटल्याची सुनावणी ठाण्याचे विशेष पाेक्सो न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात १२ फेब्रुवारी राेजी झाली. आराेपीला शिक्षा मिळण्यासाठी सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी सर्व साक्षी पुरावे सादर करून बाजू मांडली. पाेलिस हवालदार सुशांत शेलार यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.