ठाणे : रखडलेली १२५ कोटींची देणी मिळावीत, कोर्टाने आदेश देऊनही ६१५ कर्मचाऱ्यांना अद्यापही परिवहनने सेवेत सामावून न घेणे, यासह विविध मागण्यांसाठी परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सामूहिक रजा आंदोलनाची हाक दिली. ा आंदोलनात पहाटे सहा तास एकही बस आगारातून बाहेर पडू दिली नाही. अखेर, परिवहनचे महाव्यवस्थापक संदीप माळवी यांनी मध्यस्थी केल्यानंतर सकाळी ८.३० पासून कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. सुदैवाने, स्वातंत्र्य दिनाची सुटी असल्याने प्रवाशांना या आंदोलनाचा फारसा फटका बसला नाही. वारंवार केवळ आश्वासनेच दिली जात असल्याने कर्मचाऱ्यांनी रजा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. ते शमविण्यासाठी पालिका प्रशासनाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मध्यस्थी करून मागे घेण्याची विनंती केली होती. असे असतानाही कर्मचाऱ्यांनी शनिवारी बंदची हाक दिली. त्यामुळे पहाटे २.५० वाजता पहिली बस वागळे डेपोतून बाहेरच पडली नाही. सकाळी ८ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवले होते. अखेर, परिवहनचे महाव्यवस्थापक संदीप माळवी यांनी कर्मचाऱ्यांबरोबर यशस्वी चर्चा करून त्यांना लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. त्यानंतर, ८.३० पासून वागळे आणि कळवा आगारांतून नियमित बस बाहेर पडल्या. आता सोमवारी यासंदर्भात बैठक घेतली जाणार असून यावर तोडगा निघेल, अशी आशा या कर्मचाऱ्यांना वाटत आहे. (प्रतिनिधी)
टीएमटी बससेवा सहा तास बंद
By admin | Updated: August 16, 2015 02:09 IST