लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सुमारे सात वर्षांपासून शिकवणाऱ्या ३० ते ३५ शिक्षकांना अद्यापही कायम करून घेण्यात आले नसल्याचा आरोप करून या शिक्षकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन सेवेत कायम करण्यासाठी साकडे घातले. महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमातील शिक्षकांची स्थिती अतिशय वाईट आहे. सात वर्षांपासून फक्त तीन ते सहा हजार रुपयांवर सुमारे ३५ शिक्षक काम करीत आहेत. शासन निर्णयावरून या शिक्षकांना तीन वर्षांनी सेवेत कायम करून नियमित वेतन श्रेणी देणे अपेक्षित आहे; परंतु या निर्णयास धाब्यावर बसवून शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप शिक्षकांनी पालकमंत्र्याना दिलेल्या निवेदनात केला आहे. या शिक्षकांना कायम करण्याचा ठामपाचा ठरावही आहे. मात्र अद्यापही त्यांना कायम करण्यात आलेले नाही. प्रशासनाकडे वेळोवेळी विचारणा केली असता प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे दिली जातात. महापालिका शाळेतील सुमारे ५० विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या दोन दोन वर्गांची जबाबदारी पार पाडणाऱ्या या शिक्षकांना कायम सेवेपासून वंचित ठेवले जात आहे. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शिक्षकांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांची सेवा त्वरीत कायम करण्याची मागणी या शिक्षकांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
टीएमसीच्या शिक्षकांचे पालकमंत्र्यांना साकडे
By admin | Updated: June 29, 2017 02:49 IST