भिवंडी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम तसेच मुंबई महानगरपालिकेकडून पाणीकपात होत असल्याने येऊ घातलेले सण साजरे करण्यात अडचण होऊ शकते. हे लक्षात घेऊन नागरिकांच्या मागणीनुसार गणेशोत्सव आणि बकरी ईदच्या दिवशी पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना स्टेममार्फत ७३ एमएलडी, मुंबई महानगरपालिकेमार्फत ४० एमएलडी तर वऱ्हाळा तलावातून २ एमएलडी असा पाणीपुरवठा होतो. त्यापैकी मुंबई महानगरपालिकेने ३० टक्के पाणीकपात केली आहे. तर, स्टेमकडून बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा होत नाही. यंदा गणेशोत्सव व बकरी ईद हे दोन्ही सण गुरुवारी आल्याने हिंदू-मुस्लिम बांधवांच्या सणांमध्ये अडचण निर्माण होऊ शकते, हे लक्षात घेऊन मनपा आयुक्त बालाजी खतगावकर यांनी बुधवार आणि गुरुवार रोजी पाणीपुरवठा बंद न करता नागरिकांना वेळेत पाणी द्यावे, असा आदेश पाणीपुरवठा विभागास दिला आहे. त्यामुळे पाणीकपात न होता नागरिकांना वेळेत पाणी उपलब्ध होणार आहे.गणेशोत्सवासाठी पाण्याचे महत्त्व आहे. त्यासाठी गणेशभक्तांना त्यांच्या वेळेत पाणी मिळाले पाहिजे तसेच बकरी ईदनिमित्ताने कुर्बानीच्या ठिकाणी पाणी भरपूर लागते. त्यामुळे त्या दिवशी पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे.- निलेश चौधरी, गटनेते
सणासुदीला भिवंडीत पाणी-कपात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2015 23:33 IST