धीरज परब/ मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील प्रचंड घोळ अंतिम यादीत देखील सुधारण्यात आलेला नाही. उलट अंतिम यादीत तर आगीतून फुफाट्याकडे गेल्या सारखी परिस्थिती मतदार व राजकारण्यांची झालेली आहे. अंतिम यादीत देखील मोठे घोळ असून पाली - डोंगरी - तारोडी भागातील मतदारांची नावे घरा पासून तब्बल १० किमी लांब भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क भागातील प्रभागात टाकण्यात आली आहेत. असे प्रकार सर्रास सर्वच प्रभागाच्या अंतिम यादीत असल्याने महापालिका आणि आयोगाच्या कारभारावर टीकेची झोड उठत आहे.
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्या वापरल्या जात आहेत. त्या मतदार याद्या मुळात घोटाळ्याच्या असल्याच्या तक्रारी असताना त्याच सदोष याद्यांचा वापर मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी केला गेला आहे. त्यातूनच महापालिकेच्या कर विभागाने विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यांची २४ प्रभाग निहाय विभागणी केली. परंतु प्रारूप मतदार याद्यां मध्ये एका एका प्रभागातील काही हजार नावे आजूबाजूच्या तसेच लांबच्या प्रभागात टाकण्यात आल्याने ह्या प्रचंड अफरातफरी वर मोठी टीका झाली. तब्बल ७४० हरकती ह्या प्रारूप याद्यांवर नोंदवण्यात आल्या होत्या.
स्वतः महापालिकेनेच दुबार मतदारांची संख्या तब्बल ४४ हजार ८६२ इतकी असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात जागेवर नसलेल्या मतदारांची संख्या देखील हजारोंच्या घरात असल्याने दुबार आणि अस्तित्वात नसलेल्या मतदारांची संख्या लाखाच्या घरात पाहता बोगस मतदानाची मोठीह भीती आहे.
मात्र तरी देखील महापालिकेने आणि आयोगाने सदोष मतदार याद्या प्रभाग निहाय काटेकोरपणे सुधारून न घेताच अंतिम यादी म्हणून प्रसिद्ध करून टाकल्या. सदर याद्या पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या असल्या तरी प्रत्यक्ष रीतसर याद्या घेण्यास इच्छूकांची सुरवात झाली आहे. सदर याद्यांची पडताळणी केली असताना सर्वच पक्षीयांच्या इच्छूकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. कारण परिसरचा परिसर हा दुसऱ्या प्रभागां मध्ये टाकण्यात आला आहे.
भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क आदी परिसर प्रभाग २ मधील निवासी संकुलेच्या संकुले आजूबाजूच्या प्रभाग ३ व ४ मध्ये टाकण्यात आली आहेत. तर प्रभाग ३ मधील नावे प्रभाग २ मध्ये टाकली आहेत. प्रभाग २ मध्ये तर तब्बल १० किमी लांब असलेल्या डोंगरी - तारोडी व पाली ह्या प्रभाग २४ मधील सुमारे १६०० मतदारांची नावे टाकण्यात आली आहेत. इंद्रलोक - पूजापार्क आदि प्रभाग १२ मधील तसेच प्रभाग १४ काशिमिरा आणि प्रभाग १३ हटकेश मधील मतदारांची नावे मीरारोडच्या प्रभाग १८ मध्ये टाकण्यात आली आहेत. असे प्रकार सर्वच प्रभागां मध्ये आहेत अश्या तक्रारी समोर येत आहेत.
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट
अंतिम मतदार यादीतील ह्या घोळा नंतर शिवसेना ठाकरे गटच्या नीलम ढवण, ज्योती शेवंते तर मनसेचे हेमंत सावंत, सचिन पोपळे आदींनी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची भेट घेतली. यावेळी प्रारूप मतदार यादीतील घोळ आणि अंतिम यादीतील घोळ हा भाजपाच्या दबावाखाली पालिका प्रशासनाने केला आहे. कारण कर विभागाच्या कर्मचाऱ्यांना सर्व परिसर माहिती असताना देखील चुकीची यादी कशी बनली? असा सवाल शिष्टमंडळाने केला. त्यावर आयुक्तांनी आपण ह्यात काही करू शकत नाही असे स्पष्ट करतानाच कर विभागाच्या उपायुक्त यांना बोलावून सदोष यादी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती सचिन पोपळे यांनी दिली आहे.
Web Summary : Mira Bhayandar's final voter list is riddled with errors. Voters are listed in wards far from their homes, up to 10 km away. Despite objections, the list remains flawed, raising concerns about bogus voting. Officials blame administrative errors and promise investigation.
Web Summary : मीरा भायंदर की अंतिम मतदाता सूची त्रुटियों से भरी है। मतदाताओं के नाम उनके घरों से दूर, 10 किमी तक के वार्डों में सूचीबद्ध हैं। आपत्तियों के बावजूद, सूची त्रुटिपूर्ण है, जिससे फर्जी मतदान की चिंता बढ़ रही है। अधिकारी प्रशासनिक त्रुटियों को दोष देते हैं और जांच का वादा करते हैं।