वसई : वसई-विरारमध्ये डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि मलेरिया या रोगांचे थैमान सुरू असून अनेक रुग्ण खाजगी आणि सरकारी इस्पितळांत दाखल आहेत. अनेक रुग्णांनी मुंबईतील केईएम तसेच अन्य सरकारी रुग्णालयांत धाव घेतली आहे. स्वाइनने ५ तर डेंग्यूने दोघे दगावल्याने चिंतेचे वातावरण आहे.स्वाइन फ्लूच्या ६९ संशयित रुग्णांपैकी ४२ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून या रोगामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, डेंग्यूचे ६० रुग्ण आढळले असून १९ जण बाधित आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अनेक रुग्णांनी मुंबईतील सरकारी रुग्णालय गाठले आहे. मात्र, या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वसई-विरारमधील नागरिकांची यादी मनपाकडे पाठवण्यात येत नसल्याने आकडेवारी मिळू शकत नसल्याचे मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपमा राणे यांनी लोकमतला सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. राणे म्हणाल्या, मनपाच्या हद्दीत या दोन्ही रोगांचे रुग्ण आढळले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. फक्त ग्रामीण भागात किती रुग्ण आहेत, याची आकडेवारी कळू शकत नाही. ती माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आपापल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत द्यायला हवी. शहरी तसेच ग्रामीण भागातील डॉक्टरांचे दवाखाने रुग्णांनी भरलेले दिसतात. औषध फवारणी, गटारांत औषध टाकणे, अशा महत्त्वाच्या कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे या रोगांचा फैलाव रोखणे प्रशासनाला शक्य होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वसई-विरारमध्ये स्वाइनचे ४२ तर डेंग्यूचे १९ रुग्ण
By admin | Updated: October 3, 2015 02:20 IST