ठाणे : पुढील महिन्यात होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी २१ जानेवारीला प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. परंतु, सर्व्हरमध्ये काही तांत्रिक बाबी निर्माण झाल्याने अद्यापही ती प्रसिद्ध झालेली नाही. असे असले तरी यंदाच्या निवडणुकीत १२ लाख ३० हजार २६३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ६८ हजार ८१६ एवढी असून स्त्री मतदारांची संख्या ५ लाख ६१ हजार १७८ एवढी आहे. विशेष म्हणजे २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत केवळ ३५ हजार ४२७ मतदारांची वाढ झालेली आहे. ही सार्वत्रिक निवडणूक पुढील महिन्यात पार पडणार असून यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पालिकेने आतापासूनच पावले उचलण्यास सुरवात केली आहे. २००७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महापालिका क्षेत्रामधील लोकसंख्या ही १२ लाख ६५ हजार ५५१ एवढी होती. तर मतदार संख्या ९ लाख ९ हजार ५७३ एवढी होती. २०१२ च्या निवडणुकीमध्ये १८ लाखांच्या वर लोकसंख्या गेली. तर ११ लाख ९४ हजार ८३६ इतकी मतदार संख्या होती. दरम्यान आता फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये ११ लाख ४८ हजार मतदारांची नोंदणी झाली होती. आता अंतिम यादी पुढे आली असून यामध्ये ८२ हजार २६३ नव्या मतदारांची भर पडली आहे. परंतु, मागील निवडणुकीच्या तुलनेत ही वाढ केवळ ३५ हजार ४२७ एवढीच असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान २१ जानेवारीला अंतिम यादी जाहीर केली जाणार होती. परंतु आज चार दिवस उलटले तरीदेखील ती निवडणूक विभागाकडून प्रसिद्ध झालेली नाही. दुसरीकडे नव्या प्रभाग रचनेनंतर ३३ प्रभागांमध्ये १३१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे आधीचे प्रभाग आणि आता नव्याने अंतिम झालेले प्रभाग यांची सांगड घालून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. मागील निवडणुकीत ५३.२६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. परंतु, यंदा ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याहीपुढे जाऊन, पालिकेच्या निवडणूक विभागाने मागील निवडणुकीत प्रत्येक प्रभागाची मतदानाची टक्केवारी काढली आहे. - पालिकेने जाहीर केलेल्या या मतदार यादीत सर्वाधिक मतदात्यांची संख्या असलेला प्रभाग हा १५ नंबरचा असून येथील मतदारांची संख्या ही ५० हजार ७६३ एवढी आहे. तर सर्वात कमी मतदारांची संख्या असलेला प्रभाग क्र. २९ हा असून या ठिकाणी केवळ २० हजार ४१८ मतदार आहेत.
ठामपात १२ लाख ३० हजार २६३ मतदार
By admin | Updated: January 31, 2017 03:09 IST