- सदानंद नाईक उल्हासनगर : मध्यवर्ती जिल्हास्तरीय रुग्णालय भोवती भंगार साहित्याचा विळखा पडल्याने, आरोग्य सेवेवर परिणाम झाल्याचे निवेदन मनसेचे मैनूद्दीन शेख यांनी आरोग्य उपसंचालकानां दिले. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती शेख यांनी आरोग्य विभागाला दिली आहे.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, ग्रामीण परिसर मधून शेकडो रुग्ण रुग्णालयात उपचार करण्यासाठी येतात. रुग्णालय नूतनीकरण व इतर सुविधेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक मनोहर बनसोडे यांनी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न केले. मात्र व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारावर मनसेच्या शिष्टमंडळाने टीका केली. रक्त तपासणीचे रिपोर्ट एका आठवड्यांनंतर मिळत असल्याचा आरोप शेख यांनी केला. बाह्यरुग्ण विभाग सकाळ व संध्याकाळी सुरु ठेवाण्याची मागणीही केली आहे. मध्यवर्ती रुग्णालयाच्या सभोताली व अनेक ठिकाणी भंगार साहित्य अत्यावस्था पडले असून अनेक वॉर्ड सुस्थितीत असतांना बंद आहेत. मलवाहिन्या फुटलेल्या असून दुर्गंधी व उग्र वासाने रुग्णासह नागरिक त्रस्त आहेत. रुग्णालयातील समस्यांच्या तक्रारींचे निवेदन मनसेच्या शिष्टमंडळाने आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे विभागाचे उप-संचालक अशोक नांदापुरकर व मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठविले आहे.
यावेळी मैनुद्दीन शेख, ऍड.कल्पेश माने, शैलेश पांडव, कैलास घोरपडे, कैलास वाघ, प्रकाश कारंडे, मोहित बेहराणी, दीपेश धारिवाल, नरेश चिकसे,जगदीश माने,साहिल सय्यद आदिजण उपस्थित होते.