ठाणे : वाहतूक शाखेच्या पोलीस महिला हवालदाराला झालेल्या मारहाणप्रकरणी, शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत कालगुडे याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी ठाण्यात राजकारण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ शनिवारी महिला काँग्रेसने आंदोलन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदन देऊन, शिवसेनेच्या शाखाप्रमुखावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपाने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही, पण सर्वच पक्षांनी टीकेची झोड उठवल्याने, शिवसेनेची चारही बाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेस अध्यक्षा चित्रा वाघ यांनी, या घटनेत मारहाण झालेल्या महिला पोलीस हवालदाराची शुक्रवारी भेट घेतली. त्याचदरम्यान, वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांची भेट घेऊन, कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी शनिवारी ठाणे जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या आवारात त्या घटनेविरोधात आंदोलन करून निषेध नोंदवला. हे आंदोलन ठाणे काँग्रेस शहराध्यक्षा ज्योती ठाणेकर आणि प्रदेश सचिव सुमन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली क रण्यात आले. या वेळी मारहाण करणाऱ्या त्या शाखाप्रमुखावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली, तसेच मनसेने या मारहाणीप्रकरणी वाहतूक शाखेच्या सहायक आयुक्त पुलकेशीन मठाधिकारी यांना निवेदन देत, त्या शाखाप्रमुखावर क ठोर कारवाईची मागणी केली. हे निवेदन देताना मनसे उपविभागाध्यक्ष विजय रोकडे, मनविसे विभागाध्यक्ष अरविंद बाचकर, विक्रम पवार आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पोलीस मारहाणीवरून ठाण्यात राजकारण
By admin | Updated: February 28, 2016 01:43 IST