ठाणे : ‘होप’ नावाच्या अॅपला फारसा प्रतिसाद मिळाला नसतांनाही आता ठाणे पोलिसांनी संकटात सापडेल्या नागरिकांसाठी ‘प्रतिसाद’ नावाचे नवीन अॅप सुरु केले आहे. नागरिकांकडून संकटात सापडल्याची तत्काळ माहिती मिळावी आणि त्यातून त्यांच्या सुटकेसाठी पोलिसांची मदत पोहचिवता यावी, या उद्देशातून हे अॅप सुरु केले आहे. संकटग्रस्ताने या अॅपवर मदतीसाठी क्लिक केल्यानंतर पोलिसांना त्यासंबंधीचा संदेश मिळणार आहे. याशिवाय, संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनाही हा संदेश जाणार आहे. या संदेशामुळे संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या घटनास्थळाची माहिती पोलिसांना मिळणार असून त्याआधारे त्यांचे पथक मदतीसाठी धाव घेणार आहे. ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ‘प्रतिसाद’ नावाचे अॅप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार ते नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिले आहे. या अॅपद्वारे नागरिकांना संकटात अडकल्याची माहिती पोलिसांना देता येऊ शकते. या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक काही क्षणातच घटनास्थळी धाव घेऊन त्याची संकटातून सुटका करणार आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना संकट काळात याचा फायदा होणार असल्यामुळे त्याच्यासाठी हे अॅप फारच उपयुक्त आहे. तसेच ते राज्यात कुठेही वापरता येऊ शकते, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली. अॅन्ड्राईड किंवा अॅपल मोबाईल धारकांनाच ते घेता येऊ शकते. मोबाईलमधील प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअर मध्ये जाऊन प्रतिसाद अॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर प्रतिसाद आस्क आणि प्रतिसाद पिसीआर हे दोन अॅपस् दिसतील. त्यापैकी प्रतिसाद अॅप इन्स्टॉल करावे आणि त्यामध्ये संबंधित मोबाईलधारकाने स्वत: ची वैयक्तीक माहिती नोंदवावी. तसेच नातेवाईकांचा क्र मांकही नोंदवावा.संकटात अडकल्यानंतर तत्काळ मदत हवी असेल तर प्रतिसाद अॅपमधील सोशल इमरजन्सी असे लिहीलेले लाल रंगाचे बटण दाबावे. तसे करताच तसा संदेश पोलिसांना तात्काळ मिळेल. तसेच त्याचे घटनास्थळही पोलिसांना कळू शकेल. त्यामुळे संदेश आल्यानंतर काही क्षणातच पोलीस घटनास्थळी मदतीसाठी पोहचतील, असे ठाणे पोलिसांनी सांगितले. मोबाईलमधील इंटरनेट सुविधा सुरू ठेवल्याने मोबाईलचे लोकेशन आणि जीपीएस सर्व्हिस सुरू ठेवावी. त्यामुळे तत्काळ मदत पोहोचविता येईल.
संकटातील नागरिकांना ठाणे पोलिसांचा ‘प्रतिसाद’
By admin | Updated: June 15, 2016 02:30 IST