ठाणे : ठाणे जिल्ह्याचे सागरी, नागरी आणि डोंगरी अशा पातळीवर विभाजन करण्यात यावे, अशी मागणी विभाजनाआधी करण्यात आली होती. तर, काही जणांनी जिल्ह्याचे चौभाजन करावे, असेही म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात नवीन २२ जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार, ठाण्याचे पुन्हा एकदा आणि पालघरचे विभाजन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रस्तावित नवीन २२ जिल्हे आणि ४९ तालुके निर्मितीबाबत राज्य सरकारने मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. त्यामध्ये वित्त, महसूल नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. तसेच समितीला ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या दालनात यासंदर्भात नुकतीच एक बैठकही झाली. एका जिल्ह्याच्या निर्मितीसाठी किमान ३५० कोटी रु पये खर्च येतो. राज्य सरकारवर सध्या तीन लाख कोटींहून अधिक कर्ज आहे. अशा परिस्थितीत खर्च करणे शक्य नसतानाही सर्वच पक्षांच्या नेत्यांची मागणी असल्याने सरकारने हे पाऊल टाकले आहे. (प्रतिनिधी)
ठाणे, पालघरचे पुन्हा विभाजन?
By admin | Updated: August 16, 2015 23:27 IST