अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क: ठाण्यातील चिरागनगर भागातील दर्शन शिंदे (वय, २५) या तरुणाचा खून झाला. याप्रकरणी तुषार निरुखेकर (वय, २५) या आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी दिली. त्याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या सिद्धेश्वर तलाव परिसरात दर्शन हा त्याच्या आई सोबत वास्तव्याला होता. गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तो लक्ष्मीनगर भागात फेरफटका मारण्यासाठी गेला होता. त्याचवेळी दीड महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून तीन ते चार तरुणांनी दर्शन याला जबर मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्यासह वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांच्या पथकांनी यातील कथित आरोपी तुषार याला ताब्यात घेतले.