ठाणे : भारताच्या ६९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात सूर्योदयापूर्वीच ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या वेळी जिल्ह्यात सारे जहाँ से अच्छा, ए मेरे वतन के लोगो... या देशभक्तीपर गीतांचे सूर निनादत होते. प्रत्येक जण एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत होते. ठाणे शहरातील काही तरुणांनीही राष्ट्रध्वज हातात घेऊन मोटारसायकलवरून रॅली काढण्यात आली होती. छोट्या मुलांनीही स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नेत्यांची तसेच भारतीय जवानांची वेशभूषा करून देशावरचे प्रेम व्यक्त केले.ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला. या वेळी शासनाने दुष्काळाचा फटका बसलेल्या १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत सामावून घेण्याचा निर्णय झाला असून वैद्यकीय सेवा पुरवण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नव्याने एक लाख विहिरी आणि ५० हजार शेततळी निर्माण करण्याचा कार्यक्रमही आजपासून सुरू झाल्याचे त्यांनी जाहीर केले.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक इको टुरिझम स्पॉट विकसित करण्याच्या सूचना वन विभागाला दिल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आमदार सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, संजय केळकर, महापौर संजय मोरे, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, ठाणे महापालिका आयुक्त संजय जैस्वाल, पोलीस आयुक्त परमवीर सिंह उपस्थित होते. अधिक वृत्त/४
ठाणे जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात
By admin | Updated: August 15, 2015 23:22 IST