लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्यात उद्धवसेनेचे माजी खासदार राजन विचारे आणि शिंदेसेनेचे विद्यमान खासदार नरेश म्हस्के यांच्यातील वाक् युद्ध आता आणखी पेटले आहे. विचारे यांनी ‘अतिरेकी मारले म्हणजे मेहरबानी केली का?’ असे विधान केल्याचे सांगत म्हस्के यांनी विचारे यांच्यावर टीका केली होती. त्याला विचारे यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट टाकत प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते, पण मीच त्यांना थांबवले, असा दावा विचारे यांनी यामध्ये केला आहे.
विचारे म्हणतात की, कोरोना काळात उंदरासारखे घरातल्या बिळात लपला होतात. तेव्हा मनसेच्या नेत्याने डिवचल्यावर घराबाहेर पडलात. मी आजवर केलेल्या कामाची नुसती यादी आठवली तरी कळेल, गद्दार कोण आणि देशप्रेमी कोण?, असेही विचारे म्हणाले. खा. म्हस्के यांनीही विचारे यांना वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा देताना आपल्या पत्रास लवकरच उत्तर देईन, असे म्हटले आहे.
बाप तो बाप रहेगा
ठाण्यात सध्या विविध ठिकाणी विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त फलक लागले आहेत. त्यावर ‘बाप तो बाप रहेगा’ असा मजकूर लिहिला आहे. या निमित्ताने विचारे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यातही विचारे आजूबाजूला असलेले कार्यकर्ते ‘बाप तो बाप रहेगा’ अशी घोषणाबाजी करीत असल्याचे दिसत आहे.