टिटवाळा : शहरातील निमकरनाका ते सावरकरनगर आणि रेल्वे स्टेशन ते रेल्वे फाटकादरम्यान केडीएमसीची सुरू असलेली रस्ता रुंदीकरणाची कारवाई शुक्रवारीही सुरूच होती. केडीएसीने गुरुवारी केलेल्या कारवाईत ५१ घरे, चाळीतील खोल्या, गाळे, दुकाने, इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. मात्र, सायंकाळ झाल्याने ही कारवाई पूर्ण होऊ शकली नव्हती. परंतु, आयुक्त ई. रवींद्रन यांनी उर्वरित बांधकामेही तोडावीत, अन्यथा निलंबित केले जाईल, असा इशारा कर्मचाऱ्यांना दिला होता. त्यामुळे कारवाई पथक पुन्हा रात्री ९ वाजेपर्यंत दाखल झाले. त्या वेळी रहिवासी व कारवाई पथकात वाद झाला. टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी कारवाई पथकाला त्यांनी सकाळी कारवाइची विनंती केली. तर, बाधितांना स्वत:हून घरे रिकामी करण्यास सांगितले. त्यामुळे रात्री कारवाई टळली. दरम्यान, केडीएमसीचे ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुनील पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळपासून नांदप रोडवर कारवाई सुरू केली. त्यात दोन मोठ्या इमारती व दोन घरे जमीनदोस्त केली. (वार्ताहर)
टिटवाळ्यात कारवाई सुरूच
By admin | Updated: December 24, 2016 03:02 IST