ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असून, रुग्णालयांना कमी प्रमाणात ते उपलब्ध होत आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या शाखेतून रेमडेसिविरचा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे केवळ शिवसेनेच्या शाखेतून पुरवठा करण्यापेक्षा सर्वपक्षीय कार्यालयांत साठा दिल्यास गरजू रुग्णांना ते उपलब्ध होऊन प्राण वाचण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात लक्ष घालून सर्व पक्षांच्या कार्यालयात रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.
खासगी रुग्णालयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रेमडेसिविरची मागणी केल्यानंतर उपलब्ध साठ्यातून रुग्णालयांना ते दिले जातात. एकीकडे रेमडेसिविरचा तुटवडा असला तरी शिवसेनेच्या शाखांमध्ये रेमडेसिविर उपलब्ध असून त्यांच्याकडे कसा साठा उपलब्ध होत आहे, असा सवालही शिंदे यांनी केला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांनाच ते उपलब्ध करून दिले जात असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे. शिवसेनेकडून अशा प्रकारे भेदभाव करणे अयोग्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या लसीकरणावरून अनेक केंद्रांवर गोंधळ सुरू आहे. त्या-त्या भागात वर्चस्व असलेला पक्ष लसीकरणासाठी नोंदणी करून गेलेल्या नागरिकांना लस न देता, दुसऱ्यांनाच लस देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यातून लसीकरणाचा काळा बाजार सुरू असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. त्याठिकाणी प्रशासनाची यंत्रणा कामाला लावल्यास सर्वांना योग्य पध्दतीने लस उपलब्ध होऊ शकते असेही त्यांनी सांगितले. मुंबई किंवा इतर महापालिकांमध्ये स्मशानभूमीत लाकडांसाठी पैसे आकारले जात नाहीत. परंतु, ठाणे महापालिका त्यासाठीही पैसे आकारत आहे. महापौरांनी यात लक्ष घालून लाकडे मोफत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.
कोरोनाच्या महामारीला महाविकास आघाडी सरकार सामोरे जात आहे. आपला पक्ष वाढविण्याची किंवा मतदार वाढविण्याची ही ती वेळ नाही. या संकटातून आपण कसे बाहेर येऊ, यासाठी प्रयत्न करणे ही सध्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
.............
शिवसेनेच्या शाखा नेहमी सक्रिय असतात. शाखेच्या माध्यमातून इतर मदत दिली जात आहे. परंतु, रेमडेसिविरचा पुरवठा केला जात नाही. रेशनिंग किंवा इतर मदत शिवसेना शाखेतून होत असते. किंबहुना शिवसेनेचा प्रत्येक सदस्य वॉर रुमप्रमाणे काम करीत आहे. मनोज शिंदे यांचा गैरसमज दूर केला जाईल.
(नरेश म्हस्के - महापौर , ठामपा)