शशी करपे, वसईनवघर-माणिकपूर शहरात एका मुस्लीम कुुटुंबाला फ्लॅट नाकारला गेल्याची घटना ताजी असतानाच नायगावमध्ये एका इमारतीत फ्लॅट घेतल्यानंतर आपण दलित असल्याने ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नसल्याची तक्रार वालीव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही तर पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या करू असा इशारा खरेदीदाराने दिला आहे. किशोर गोविंद राभडीया (५४) मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक सी मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. सध्या राभडीया नायगाव येथील रॉयल कॉम्पेक्स इमारतीत पत्नी, एक मुलगा आणि एका मुलीसह राहतात. राभडीया यांनी नायगाव पूर्व येथील रश्मी पिंकसिटी या सोसायटीतील रश्मी पिंक सिटी, फेस-२, बिडींग क्रमांक ११ येथे ३०१ क्रमांकाचा फ्लॅट नोव्हेंबर २०१६ रोजी खरेदी केला आहे. हा फ्लॅट त्यांनी अमित शिवकुमार गुप्ता यांच्याकडून एजंटमार्फत खरेदी केला आहे. मात्र, फ्लॅटची स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सोसायटीकडे नाहरकत प्रमाणपत्र मागितले असता सोसायटीने नाकारल्याची राभडीया यांची तक्रार आहे. याबाबत उपनिबंधक कार्यालय, वसई यांच्याकडे चार वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सोसायटीला याबाबत नाहरकत प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देश देऊनही सोसायटी मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आपण दलित असल्याने ना हरकत प्रमाणपत्र नाकारण्यात आल्याची तक्रार राभडीया यांनी वालीव पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीत त्यांनी दलित असल्यानेच ना हरकत प्रमाणत्र नाकारून सोसायटीच्या पदाधिकारी अडवणूक करीत असल्याचा आरोप केला आहे. फ्लॅट खरेदीसाठी किशोर राभडीया यांनी बँकेकडून १७ लाख ४० हजारांचे कर्ज काढले आहे. त्यामुळे जर फ्लॅटचा ताबा मिळत नसल्याने राभडीया हे चिंताक्रांत आहेत. इतकेच नाही तर बँकेचे हप्ते कसे भरायचे हा पेच त्यांच्यापुढे येऊन पडला आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र अद्याप कारवाई झाली नसल्याचे राभडीया यांचा आरोप आहे. रश्मी पिंकसिटी फेस-२ सोसायटीतील फ्लॅटचा ताबा लवकरात लवकर न मिळाल्यास किशोर राभडीया यांनी त्यांची पत्नी सुप्रिया, मुलगा चेतन व मुलगी चंदना यांच्यासमवेत आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे प्रकरण दुय्यम निबंधकांच्या अखत्यारित येत असल्याचे सांगितले. जर दुय्यम निबंधकांनी तक्रार दिली तर आम्ही गुन्हा दाखल करून असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपूर्वी नवघर-माणिकपूर शहरातील एका सोसायटीने मुस्लीम कुटुंबाला फ्लॅट नाकारला होता. त्यावेळी फ्लॅट खरेदी केलेल्या कुटुंबाने थेट पोलिसांकडे धाव घेतली होती. माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी या लक्ष घालून गुन्हा दाखल करून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून कारवाई केली होती. आता हा दुसरा प्रकार उजेडात आल्याने वसईत खळबळ उडाली आहे.
‘ना हरकत’साठी आत्महत्येचा इशारा
By admin | Updated: February 11, 2017 03:41 IST