लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून त्याला तलवारीच्या धाकावर एका खोलीत डांबून ठेवणाऱ्या दीपक बोरसे (२४) याला वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी पाठलाग करून अटक केली आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. एका महिलेची दीपकने छेड काढली होती. त्यालाच सनी रॉय या रिक्षाचालकाने अटकाव केल्यानंतर त्याचा साथीदार राजन गुप्ता या रिक्षाचालकाला दीपकने आपल्या साथीदारांसह बेदम मारहाण केली होती.लोकमान्यनगर येथील टीएमटीच्या डेपोजवळ एका महिलेची दीपक बोरसे याने ३ जून रोजी छेड काढली होती. या प्रकाराला आक्षेप घेऊन राजन गुप्ता, प्रवीण जाधव आणि अनुप शर्मा या रिक्षाचालकांनी त्याची समजूतही घातली होती. त्याला लोकमान्यनगर पोलीस चौकीतही नेले होते. तिथे शांत बसल्यानंतर ४ जूनला मध्यरात्री त्याने काळा गण्या ऊर्फ गणेश जाधव आणि विजय यादव तसेच १० ते १५ साथीदारांसह तलवारीचा धाक दाखवून राजन गुप्ता, सनी रॉय या रिक्षाचालकांना बघून घेण्याची धमकी देऊन तिथून पसार झाला. त्यानंतर, पुन्हा ६ जूनला दीपकने साथीदारांसह येऊन सनीला घराजवळून चाकूच्या धाकावर उचलून नेले. तिथे त्याच्याकडील अडीच हजार चोरले. मद्यप्राशन करुन त्याला एका खोलीत डांबून मारहाण केली. चार तासांनंतर रामनगर जंगलात त्याला त्यांनी सोडून दिले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अपहरण आणि जबरी चोरीचा गुन्हाही दाखल झाला होता. दीपक मामाभाचे डोंगराजवळ आल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काळा गण्यासह दीपकचाही येऊरच्या डोंगरात ८ जून रोजी दुपारी पाठलाग केला. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर तो या पथकाच्या हाती लागला. त्याला १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गण्या मात्र पसार झाला.
ठाण्यात रिक्षाचालकाला मारहाण
By admin | Updated: June 10, 2017 01:08 IST