भातसानगर शहापूर गावाचे दिवसेंदिवस शहरीकरणात रुपांतर होत असताना परिसरातील गावातील शेती नजरेआड होत असताना चेरपोली पाड्यातील रमेश गणपत देशमुख (६८) हे आपल्या ७ एकर जागेत नानाविध पिकांबरोबर इतर जोडधंद्याचे व्यवसाय करीत असून हा हाडाचा शेतकरी खऱ्या कौतुकापासून वंचित राहिला आहे.आपल्या जमिनीत पावसाळी व उन्हाळी या दोन मोसमामध्ये कालव्याच्या पाण्याचा उपयोग करून पाच एकर जागेत तो भात श्ेती पिकवितो. उर्वरित दोन एकर जागेत राहते घर. घरीच डॉक्टरांच्या सल्ल््याने आणलेल्या १० संकरीत गायीपासून रोज ५० लीटर दूध शहापुरात ठरलेल्या उकडेवाल्यांना वर्षानुवर्ष देतो. तर मोकळ्या जागेत शेकडो गावठी कोंबड्यांचे बिनखर्ची उत्पादन घेतो. तसेच घराच्या पाठीमागे ३ हजार कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म चालवतो.उर्वरीत जागेत आंबे, चिकू, नारळ, कढीपत्ता, गवतीचहा आदींचे मोठे उत्पादन प्रती वर्षी सुरु आहे. यापासून १ लाख रुपयांपर्यंतचे उत्पादन त्यांना मिळते.उन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यावर झाडांमधील मोकळ्या जागेत कांदे, गहू, वाल, हरभरा, तूर याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे महागड्या डाळी त्यांना विकत घ्याव्या लागत नाहीत. विशेष म्हणजे या उत्पादनासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढलेले नाही. केवळ पहाटे साडेचार ते रात्री उशिरापर्यंत ते वयाच्या ६८ व्या वर्षीही मेहनत घेतात. त्यांच्या या कष्टात आपल्या कुटुंबाचा मोठा असल्याचे ते सांगतात. खेड्या पाड्यात शेतीत आज मजा राहिली नाही किंवा ती फायद्याची नाही. ती परवडेनाशी झाली आहे असे म्हणणाऱ्यांच्या या आजोबांनी मात्र अंजन घातले आहे. मात्र, पंचायत समिती, जिल्हा परिषद,महाराष्ट्र शासन यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या आदर्श शेतकरी या पुरस्कारापासून ते वंचितच राहिल्याची खंत सर्वत्र व्यक्त होत आहे.
असाही आदर्श, ६७ वर्षाच्या बळीराजाचा
By admin | Updated: September 25, 2015 02:04 IST