म्हारळ : एक कोटी मुद्रांक शुल्क अनुदान घोटाळा प्रकरणी तक्रारींची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेऊन चौकशी समिती स्थापन केली असून ती तीन दिवसांत आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे.माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या मुद्रांक शुल्क अनुदान प्रकरणी २०१२-१३ आणि २०१३-१४ या कालावधीत म्हारळ ग्रामपंचायतीस मिळालेल्या मुद्रांक शुल्क अनुदानामध्ये तब्बल १ कोटी ७ लाखांचा घोटाळा असल्याची तक्रार झाल्याने या घोटाळ्याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरल्याने तक्रारीची दखल घेऊन् जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती स्थापन केली. त्यामध्ये एम.आर. बोरकर या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच दोन विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. समितीने मंगळवारी सकाळी गटविकास अधिकारी व पोलिसासमवेत म्हारळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाऊन सील केलेल्या दप्तराची तपासणी सुरु केली. या समितीचा अहवाल तीन दिवसांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येणार असून तेच पुढील निर्णय घेणार असल्याने संपूर्ण म्हारळवासीयांचे या घोटाळ्यावर लक्ष लागले आहे. दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जावी, अशी जनतेची मागणी आहे.(वार्ताहर)सील केलेले संपूर्ण रेकॉर्ड तपासून तीन दिवसांत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे त्याचा अहवाल सादर करणार आहोत.- एम.आर. बोरकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद ठाणेआम्ही स्वच्छ आहोत चौकशी नंतर सत्य समोर येईलच.- प्रगती कोंगेरे, सरपंच, म्हारळ ग्रामपंचायत
मुद्रांक शुल्क घोटाळा : समिती स्थापन, अहवाल तीन दिवसांत
By admin | Updated: October 6, 2015 23:34 IST