चिकणघर : कल्याणमधील फडके मैदानावर आठवडाभर सुरू असलेल्या कोळी, आगरी, मालवणी महोत्सवाची रविवारी तिन्ही समाजांच्या सांस्कृतिक कार्यक्र मांनी जल्लोषपूर्ण वातावरणात सांगता झाली.आठ दिवस चाललेल्या यंदाच्या महोत्सवातील ५० टक्के स्टॉल महिला बचत गटांना देण्यात आले होते. यामुळे यंदा महिलांचा सहभाग जास्त दिसून आला. कोळी गीतांवरील नृत्य, लावणी, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर, क्विज अवर, जोडी तुझी माझी या मनोरंजनाच्या कार्यक्र मांसह सौंदर्य स्पर्धांच्या माध्यमातून कल्याण ‘ब्युटी क्वीन’ हा पुरस्कार देण्यात आला. सलग आठ दिवस लकी ड्रॉ द्वारे आठ महिलांना पैठणी देण्यात आली.आगरी कोळ्यांच्या खापरीवरच्या तांदळाच्या गरमागरम भाकऱ्या, मालवणी वडे आणि सोलकढीचा खवय्यांनी आनंद लुटला. याशिवाय मसाले, पापड, आयुर्वेदिक औषधे आणि घरगुती वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात विक्र ी झाली.या महोत्सवास दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर, खा. कपिल पाटील, आ नरेंद्र पवार, महापौर राजेंद्र देवळेकर, कोळी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील, माजी आमदार प्रकाश भोईर, कवी अरुण म्हात्रे, भाजपाचे प्रदेश चिटणीस पंढरीनाथ पाटील आदी मान्यवरांनी महोत्सवाला उपस्थिती लावली. कोळी समाज संघाचे देवानंद भोईर यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते. (वार्ताहर)
कोळी, आगरी महोत्सव उत्साहात
By admin | Updated: April 24, 2017 23:52 IST