चिपळूण : सागरी सुरक्षा सध्या महत्त्वाची असून, या सुरक्षेवर आम्ही विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्या दृष्टीने जनजागृती करण्याचे काम सुरु असल्याचे कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. चिपळूण येथे पोलीस वसाहतीमध्ये वाशिष्ठी बहुउद्देशीय सभागृह व पोलीस कॅन्टीनचे उद्घाटन महानिरीक्षक गुप्ता यांच्या हस्ते आज (मंगळवारी) सायंकाळी झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक पांडे, पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे, सावर्डेचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, शिरगावचे पोलीस निरीक्षक संपत पाटील, एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील, गुहागरचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, बाणकोटचे पोलीस निरीक्षक डंगारे, मंडणगडचे पोलीस निरीक्षक पी. एस. मिसर, दापोलीचे प्रमोद मकेश्वर, खेडचे पोलीस निरीक्षक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक यादव, अविनाश मते, रणजित आंधळे, राठोड आदी उपस्थित होते. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती व अधिकाऱ्यांची ओळख करुन घेण्यासाठी आपला हा प्राथमिक दौरा आहे. पोलिसांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील. रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली या पोलीस ठाण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. पोलीस अधीक्षक डॉ. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पोलिसांचे टीमवर्क महत्त्वाचे आहे. ते साधायचे असेल तर त्यांच्या कुटुंबीयांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे, असे सांगून शिंदे यांनी येथे सुरु झालेल्या कॅन्टीनबाबत माहिती दिली. यावेळी नगरसेवक इनायत मुकादम, नाझिम अफवारे उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक आंधळे यांनी सूत्रसंचालन केले, तर पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)पोलिसांना आपली ड्युटी करणे सहज सोपे व्हावे यासाठी त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर आपला भर असेल. आता गणेशोत्सव व त्यानंतर येणारी निवडणूक पाहता २ महिने आपल्याला बंदोबस्तातून उसंत मिळणार नाही. पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी आपण सर्व ते प्रयत्न करु अशी ग्वाही यावेळी बोलताना अभिजीत गुप्ता यांनी दिली.
सागरी सुरक्षेला विशेष प्राधान्य--पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी आपण सर्व ते प्रयत्न करु
By admin | Updated: August 12, 2014 23:20 IST